मुख्य आरोपी संजयला तुरुंगात प्रश्नोत्तरे : माजी प्राचार्यांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल
वृत्तसंस्था/ कोलकाता
कोलकाता बलात्कार प्रकरणाचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करणारी सीबीआय तपासासाठी सर्व पद्धती आजमावत आहेत. मुख्य आरोपीपासून माजी प्राचार्यांपर्यंत सर्व संशयितांची कसून चौकशी केल्यानंतर आणखी काही गुपिते उलगडण्यासाठी सात जणांची पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली. दिल्लीहून विशेष सीएफएसएल टीम कोलकाता येथे पोहोचल्यानंतर ही पॉलीग्राफ चाचणी घेण्यात आली.
या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय, माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यासह त्या रात्री रात्रपाळीवर असलेले चार कनिष्ठ डॉक्टर आणि एका स्वयंसेवकाचा पॉलीग्राफ चाचणी झालेल्यामध्ये समावेश आहे. दिल्लीच्या सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीतील पॉलीग्राफी तज्ञांची टीम ही चाचणी करत आहे. मुख्य आरोपी संजय रॉयची पॉलीग्राफ चाचणी तुरुंगातच करण्यात आली. तो सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. उर्वरित सहा जणांची चाचणी सीबीआय कार्यालयात झाली.
संजय रॉय हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याने त्याची पॉलीग्राफ चाचणी आवश्यक होती. त्याच्याकडून संशयानुसार गुन्हा केव्हा आणि कसा केला आणि त्याच्यासोबत आणखी कोणी सहभागी आहे का, याची माहिती घेण्यात आली. माजी प्राचार्य संदीप घोष हा सुऊवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात आहे. नवव्या दिवशीपर्यंत त्याची 100 तासांहून अधिक चौकशी करण्यात आली आहे. याप्रकरणी सीबीआयने शनिवारी त्याच्यावर औपचारिकपणे गुन्हा दाखल केला आहे. घोष याच्या उत्तरांनी सीबीआय समाधानी नाही. त्याच्याबाबत सबळ पुराव्यांचा मागमूस लागल्यानंतर त्याला कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआय अधिकाऱ्यांनी अलीपूर न्यायालयात त्यांच्याविऊद्धच्या एफआयआरची प्रत सादर केली आहे.
9 ऑगस्टच्या रात्री उशिरा कोलकात्याच्या आरजी कर हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. सकाळी तिचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानंतर देशभरातील डॉक्टरांनी आंदोलन केले. कोलकात्यातील डॉक्टर सलग 16 व्या दिवशी संपावर आहेत. जोपर्यंत आमच्या बहिणीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. याशिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही, असे मत त्यांनी मांडले आहे.
कोलकाता उच्च न्यायालयाने आरजी कर ऊग्णालयातील आर्थिक अनियमिततेचे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले होते. शनिवारी एसआयटीने या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे सीबीआयकडे सोपवली आहेत. सीबीआयने तपास सुरू केला आहे.









