वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय राजधानीतील हवेच्या प्रदूषणामुळे विश्वचषक स्पर्धेतील श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील आज सोमवारी होणार असलेल्या लढतीवर अनिश्चिततेचे सावट पसरलेले आहे. त्यामुळे सामना खेळविण्यास की, खेळाडूंचे आरोग्य जपण्यास प्राधान्य दिले जाते ते पाहावे लागणार आहे. घातक धुक्याच्या जाड थराने पुन्हा एकदा दिल्लीला वेढले आहे. दोन्ही संघांना किमान एकदा त्यांचा सराव रद्द करावा लागलेला आहे. कारण हवेच्या दर्जाचा निर्देशांक गंभीर श्रेणीत पोहोचला आहे.
श्रीलंका संघाने शनिवारी सरावासाठी बाहेर न येण्याचा निर्णय घेतला, तर बांगलादेशच्या खेळाडूंनी शनिवारी संध्याकाळी फिरोजशाह कोटलावर मास्क घालून सराव केला. खराब हवेमुळे बांगलादेशने शुक्रवारी त्यांचे सुऊवातीचे सराव सत्र रद्द केले होते. गुऊवारपासून ‘हवेच्या दर्जाचा निर्देशांक’ 500 च्या मोजपट्टीवर 400 अंकांच्या वर राहिलेला आहे आणि ‘एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टम’नुसार, मंगळवारपर्यंत स्थिती ‘गंभीर’ राहण्याची शक्यता आहे. रविवारी सकाळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार सदर निर्देशांक’ 457 होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे की, सोमवारी सामनाधिकाऱ्यांनी हवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन केल्यानंतर सामन्याच्या भविष्याबद्दल निर्णय घेतला जाईल.
या सामन्यापुरते सांगायचे झाल्यास बांगलादेश आधीच स्पर्धेबाहेर पडलेला आहे, तर श्रीलंकेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा कामगिरीपेक्षा गणित आणि नशिबावर जास्त अवलंबून आहेत. 10 संघामध्ये बांगलादेश नवव्या क्रमांकावर, तर श्रीलंका सातव्या स्थानावर आहे आणि ते पाकिस्तानमध्ये 2025 साली होणार असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरण्याच्या दृष्टीने आपले स्थान टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतील. श्रीलंकेने बांगलादेशविऊद्ध खेळलेल्या 53 एकदिवसीय सामन्यांपैकी 42 सामन्यांमध्ये विजय मिळविलेला आहे.
भारतीय वेगवान गोलंदाजांसमोर विलक्षण घसरगुंडी उडाल्यानंतर श्रीलंका या सामन्यात उतरत आहे. बांगलादेशची स्थितीही त्यांच्याप्रमाणेच खराब असून कुसल मेंडिसच्या नेतृत्वाखालील संघाला त्यांच्याविरुद्ध आपली कामगिरी उंचावण्याची चांगली संधी आहे. दुखापती हा एक मुद्दा असला, तरी श्रीलंकेचे खेळाडू उच्च दर्जाच्या प्रतिस्पर्ध्यांसमोर टिकाव धरू शकलेले नसून बांगलादेशला त्यांच्या या कमकुवतपणाचा फायदा घ्यायचा असेल, तर त्यांना उत्कृष्ट कामगिरी करून दाखवावी लागेल.
श्रीलंकेला या स्पर्धेतून सदीरा समरविक्रमा हा चांगला खेळाडू गवसलेला असून फलंदाजीत सातत्य नसले, तरी पथुम निसांका आणि कर्णधार कुसल मेंडिस यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. त्यांची गोलंदाजी हेलकावे खात राहिलेली असून प्रमुख फिरकी गोलंदाजांच्या अभावाचा संघाला त्रास झालेला आहे. दुसरीकडे, बांगलादेशला संघातील गोंधळ आणि फॉर्मचा अभाव याने ग्रासलेले असून सलग सहा पराभवांना सामोरे जावे लागले आहे. त्यांच्या फलंदाजांना मोठी भागीदारी करता आलेली नाही आणि गोलंदाजही धावांचा ओघ रोखण्यात किंवा बळी घेण्यात अयशस्वी ठरले आहेत.
संघ-बांगलादेश : शाकिब उल हसन (कर्णधार), लिटन दास, तनझिद हसन तमीम, नजमुल हुसेन शांतो, तौहीद ह्रदोय, मुशफिकर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराझ, नसुम अहमद, महेदी हसन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रेहमान, हसन महमूद, शोरिफुल इस्लाम, तनझिम हसन साकिब.
श्रीलंका : कुसल मेंडिस (कर्णधार), कुसल पेरेरा, पथुम निसांका, लाहिरू कुमारा, दिमुथ कऊणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजय डिसिल्वा, महीश थीक्षाना, दुनिथ वेललागे, कसून रजिथा, अँजेलो मॅथ्यूज, दिलशान मदुशंका, दुशन हेमंथा, चमिका कऊणारत्ने.
सामन्याची वेळ : दुपारी 2 वा.









