केंद्र-राज्य सरकारच्या माध्यमातून सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प राबविण्याचा संकल्प : नदीत मिसळणारे सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणेचे काम प्रगतीपथावर
खानापूर : खानापूर शहराजवळून वाहणाऱ्या मलप्रभा नदीचे पाणी शहराला पाणीपुरवठा यंत्रणेद्वारे पुरविण्यात येते. मात्र नदीत खानापूर शहराचे सांडपाणी मिसळत असल्याने खानापूर शहरात नदीचे प्रदूषण होत आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते पुन्हा नदीत सोडण्याची योजना मंजूर झाली होती. मात्र या योजनेत म्हणावा तसा पाठपुरावा झाला नसल्याने ही यंत्रणा वेळेत कार्यान्वित होऊ शकली नाही. मात्र केंद्राच्या हरित लवादाकडून वेळेत काम पूर्ण करण्याचा तगादा लावण्यात आल्यामुळे कर्नाटक शहर पाणीपुरवठा आणि डेनेज बोर्डाने या योजनेचे काम सुरू केले आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यात मलप्रभेचे प्रदूषण थांबणार आहे. आणि शहराला शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे. याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून दूषित पाणी शुद्धीकरण यंत्रणा खानापूर शहरासाठी मंजूर झाली होती. या योजनेसाठी 6 कोटी 28 लाख रु. चा निधी मंजूर झाला आहे. मुंबई येथील देव इंजिनियरिंग या कंपनीला कंत्राट मिळालेले आहे. शहराचे मलप्रभेत मिसळणारे सांडपाणी शुद्धीकरण करण्यासाठी दुर्गानगर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रानजीकच्या पुलाशेजारी एक, घाटानजीकच्या ब्रिजकम बंधारा येथे एक, पारिश्वाड रस्त्यावरील पुलाशेजारी एक अशा तीन सांडपाणी एकत्रिकरण करण्यासाठी 3 मीटर रुंद व्यासाच्या 12 मीटर खोलीच्या तीन विहिरी बांधण्यात येणार आहेत. येथून 20 अश्वशक्तीच्या मोटारीद्वारे हे सांडपाणी उपसा करून 4.5 कि. मी. च्या पाईपलाईनद्वारे जैन प्लॉट येथे एकत्रिकरण करण्यात येणार आहे. जैन प्लॉट येथे 30 × 30 रुंदीचा जमिनीपासून 10 फूट उंच 35 कॉलमवर प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार आहे. या प्लॅटफॉर्मवर 18 टन वजनाचे सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवण्यात येणार आहे. या यंत्रणेतून शहरातील सांडपाणी एकत्रित करून ते शुद्ध करून पुन्हा मलप्रभा नदीत सोडण्यात येणार आहे. तसेच शेतीसाठीही पाणी देण्यात येणार आहे.
देव इंजिनियरिंगकडे व्यवस्थापन
या सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणेतून तयार होणारे खत शेतकऱ्यांना मोफत देण्यात येणार आहे. या शुद्धीकरण यंत्रणेचे काम प्रगतीपथावर आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर पुढील पाच वर्षे देव इंजिनियरिंग या कंपनीकडे देखभाल व व्यवस्थापन राहणार आहे. यानंतर सदर प्रकल्प नगरपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रकल्पाचे व्यवस्थापक गजेंद्र नाईक यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली. शासनाच्या मार्गदर्शक सुचीप्रमाणे या शुद्धीकरण यंत्रणेचे काम मार्च महिन्याच्या अखेरीस सुरू होणे आवश्यक हेते. मुंबई येथील देव इंजिनियरिंग या कंपनीला सदर योजनेचे काम मिळालेले होते. मात्र स्थानिक राजकारणामुळे हे काम वेळेत सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे या शुद्धीकरण यंत्रणेचे काम उशिरा सुरू झाले आहे. नगरपंचायतीच्या नगसेवकांनीही याबाबत कोणतीच ठोस भूमिका घेतली नाही. याबाबत कोणताही पाठपुरावा केलेला नाही.
पावसामुळे सहा महिन्यानंतर प्रकल्पाचे काम सुरू?
कर्नाटक शहर पाणीपुरवठा आणि डेनेज बोर्डाच्यावतीने हे काम सुरू आहे. या खात्याचे अभियंते आणि प्रकल्प व्यवस्थापक जातीनिशी लक्ष घालून काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जर हे काम वेळेत सुरू झाले असते तर नियोजनानुसार मार्च महिन्यात हे काम संपवून जलशुद्धीकरण यंत्रणा सुरू झाली असती. काम उशीरा सुरू झाल्याने आता पावसाळा सुरू होणार असल्याने पुढील काही दिवस पुन्हा काम रखडणार असल्याने किमान सहा महिन्यानंतर सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित होण्याची चिन्हे आहेत. याबाबत प्रकल्पाचे व्यवस्थापक गजेंद्र नाईक हे प्रयत्नशील आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या शुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू आहे.









