सातारा :
सातारा शहरात प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे कार्यालय आहे. परंतु प्रदूषण मोजण्याची यंत्रणाच साताऱ्यात उपलब्ध नसायची. पुण्या-मुंबईच्या यंत्रणेवर अवलंबून रहावे लागत होते. त्यांच्याकडून रिपोर्ट येईल तेव्हाच साताऱ्याची प्रदूषणाची आकडेवारी समजायची. परंतु आता सातारा शहरात एक नव्हे चार ठिकाणी प्रदूषण मापक यंत्रे सातारा नगरपालिकेच्यावतीने बसवण्यात आली आहेत. ही यंत्रे सीएसआरमधून बसवली गेली आहेत. शहरातील हवेची दररोज या यंत्रणेद्वारे तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली.
सातारा शहराचा दिवसेंदिवस विस्तार वाढत आहे. शहरात औद्योगिकीकरणही वाढत आहे. औद्योगिकीकरण व वाढत्या वाहनांमुळे शहरात नेमके किती प्रदूषण होत आहे, शहराची हवा शुद्ध आहे की अशुद्ध याची मोजणी करणारी यंत्रणा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कार्यालयाकडे नव्हती. सातारा शहरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे कार्यालय आहे. परंतु त्या कार्यालयास पुणे, मुंबई येथून किंवा एखाद्या खाजगी कंपनीला, संस्थेला प्रदूषण मोजण्याची यंत्रणा बोलवावी लागत होती. दिवाळीच्या काळात किंवा एखाद्या कारखान्यास प्रमाणपत्र द्यायच्या वेळी दाखला देण्यासाठी त्या परिसरातील प्रदूषणाचे मोजमापे घ्यावी लागतात. परंतु सातारा शहरात प्रदूषण मोजण्याची यंत्रणा सुरु करण्यासाठी सातारा पालिकेने पुढाकार घेतला. दोन दिवसांपूर्वी सातारा शहरात प्रदूषण मोजणारी यंत्रे बसवण्यात आली आहेत.
सातारा नगरपालिकेच्या इमारतीत दोन, राजवाडा परिसरात एक आणि गोडोली परिसरात एक अशी चार यंत्रे बसवण्यात आली आहेत. त्या यंत्राद्वारे मोजण्यात आलेले अपडेट हे थेट शासनाच्या साईटवर अपलोड होत आहे. त्याची स्क्रीनही पालिकेत बसवण्यात येणार आहे. शहरातील दररोजच्या हवेची मोजमापे त्या यंत्राद्वारे घेतली जात आहेत.
- सीएसआरमधून चार यंत्रे
सातारा शहरातली हवेची गुणवत्ता मोजण्याची चार यंत्रे सीएसआरमधून बसवण्यात आली आहेत. त्या यंत्राच्या माध्यमातून थेट अपडेट वेबसाईटला दिसते आहे. हवेच्या प्रदूषणाची माहिती मिळणार आहे.
– अभिजित बापट, मुख्याधिकारी








