महापालिकेने कचरा उचल करण्याची मागणी
बेळगाव : रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेल्या कचऱ्याची उचल करण्याऐवजी कचरा पेटविला जात असल्याने शहरातील प्रदूषणात वाढ होत आहे. तसेच यामुळे नागरिकांनादेखील त्रास सहन करावा लागत असून कचरा पेटविणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. विशेष करून येळ्ळूर रोडवरील कचरा वारंवार पेटवला जात आहे. येळ्ळूर रोडवरील एका खासगी रुग्णालयापासून काही अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व इतर केरकचरा टाकला जात आहे. सदर कचऱ्याची महापालिकेकडून उचल होणे गरजेचे आहे. मात्र, उचल केली जात नसल्याने काही जणांकडून कचरा पेटवला जात आहे. परिणामी प्रदूषणात वाढ होत असून या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाकाला रुमाल धरून ये-जा करावी लागत आहे. तसेच कचऱ्याच्या उकिरड्यावर मोकाट कुत्री व इतर प्राण्यांचा वावर वाढला आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडून लाखो रुपये खर्च केले जातात. पण येळ्ळूर रोडवरील कचऱ्याची उचल करण्याकडे मात्र महापालिकेने गेल्या काही वर्षांपासून सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे. शहापूर व वडगाव परिसरातील काही रहिवाशांकडून तसेच हॉटेल व्यावसायिकांकडून रस्त्याच्या दुतर्फा कचरा टाकला जात आहे. या मार्गावर कचराकुंडी किंवा भूमिगत डस्टबिन ठेवण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.









