आचारसंहिता लागू ः 7 डिसेंबरला मतमोजणी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
हिमाचल प्रदेश आणि गुजरात राज्यानंतर आता दिल्ली महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. दिल्लीत 4 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 7 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक तारखेच्या घोषणेनंतर दिल्लीत शुक्रवारपासूनच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. दिल्ली महापालिकेची मुदत एप्रिलमध्ये संपली होती. मात्र, काही न्यायालयीन निर्देश आणि अडचणींमुळे निवडणुकांची घोषणा लांबत चालली होती. आता दिल्लीतील निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी मुंबई महापालिका निवडणुकांची घोषणा अद्याप झालेली नाही.
दिल्ली महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा अखेर शुक्रवारी करण्यात आली. दिल्ली महानगरपालिकेत 250 जागा असून त्यापैकी 42 जागा अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव आहेत. तर 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील. दिल्ली महानगरपालिकेच्या प्रभागांच्या सीमांकनानंतर केंद्र सरकारने 18 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी केली होती. दिल्लीतील सर्व 250 प्रभागांमध्ये ईव्हीएमद्वारे मतदान होणार आहे. यासाठी 50 हजारांहून अधिक ईव्हीएम ठेवण्यात येणार आहेत. तसेच मतदारांच्या सोयीसाठी निवडणुकीत एक लाखाहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.
दिल्ली महापालिकेची मुदत एप्रिल महिन्यातच संपली होती. दिल्लीत पूर्वी तीन महापालिका होत्या. आता केंद्र सरकारने एकच महापालिका केल्यामुळे नव्या वॉर्ड रचनेसाठी या निवडणुका लांबल्याचे सांगितले जाते. दिल्लीच्या तीनही महापालिका गेली 10 वर्षे भाजपच्या ताब्यात होत्या. पण गेल्या काही वर्षात आम आदमी पक्षानेही दिल्लीत चांगले बस्तान मांडले आहे. 2017 मधील निवडणुकीत महापलिकेच्या एकूण 281 वॉर्डांपैकी भाजपला 181, आम आदमी पक्षाला 49 आणि काँग्रेसला 31 जागा मिळाल्या होत्या. उर्वरित जागांवर अपक्ष आणि अन्य पक्षांचे उमेदवार विजयी झाले होते.
आप नेत्यांची उडणार धावपळ
दिल्लीत सलग दुसऱयांदा सरकार बनवल्यानंतर केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आता दिल्ली महापालिकेवरही नजर ठेवून आहे. दिल्ली महापालिकेसाठीचे मतदान गुजरातमधील विधानसभा निवडणुकांदरम्यानच होत असल्यामुळे आम आदमी पक्षाला दोन्ही ठिकाणी लक्ष केंद्रीत करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. गुजरात निवडणुकीत आम आदमी पक्ष ताकद लावत असतानाच दिल्ली महापालिकेतही त्यांची शक्ती अडकून पडेल, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.









