सीडीएस अनिल चौहान यांच्या विधानानंतर विरोधक संतप्त : संसदेच्या विशेष अधिवेशनाची काँग्रेसची मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, सिंगापूर
सिंगापूरमधील भारत-पाक संघर्षावर सीडीएस अनिल चौहान यांच्या विधानानंतर पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. पाकिस्तानसोबत अलीकडील संघर्षात भारताला लढाऊ विमाने गमवावी लागल्याचे लष्करप्रमुख आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी स्पष्टपणे कबूल केले आहे. तथापि, पाकिस्तानने केलेला सहा भारतीय विमाने पाडल्याचा दावा त्यांनी ‘पूर्णपणे चुकीचा’ असल्याचेही स्पष्ट केले. अलीकडेच जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटक मारले गेले होते, त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती.
सिंगापूरमध्ये सुरू असलेल्या शांघ्री-ला डायलॉगदरम्यान ब्लूमबर्ग टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीत जनरल चौहान यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. एका प्रश्नाला उत्तर देताना “हो, आमची काही विमाने खाली आली. त्यामागे काय चुका होत्या, हे महत्त्वाचे आहे. आकडे महत्त्वाचे नाहीत.” असे म्हटले. मात्र, भारताने झालेल्या चुका लक्षात घेत त्याचे विश्लेषण करून काही दिवसांतच नव्याने यशस्वी मोहिमा पार पाडल्याचेही चौहान यांनी स्पष्ट केले आहे.
मल्लिकार्जुन खर्गे संतापले…
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट टाकून केंद्र सरकारवर टीका केली आहे. सीडीएस अनिल चौहान यांच्या विधानाचा हवाला देत कारगिल युद्धानंतर लगेचच स्थापन झालेल्या पुनरावलोकन समितीच्या धर्तीवर सरकार काही कारवाई करेल का? अशी विचारणा त्यांनी केली. सीडीएस चौहान यांच्या मुलाखतीनंतर महत्त्वाचे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून त्यांची शहानिशा होणे आवश्यक आहे. सरकार संसदेचे तात्काळ विशेष अधिवेशन बोलावले तरच खरे सत्य बाहेर पडू शकते असे सांगत मोदी सरकारने देशाची दिशाभूल करणे थांबवावे, असेही खर्गे पुढे म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीचे श्रेय वारंवार घेत आहेत. ट्रम्प यांच्या विधानांवर स्पष्टीकरण देण्याऐवजी पंतप्रधान निवडणुकीच्या मोडमध्ये आले आहेत. सैन्याच्या शौर्याच्या मागे लपून ते सशस्त्र दलांच्या शौर्याचे श्रेय स्वत: घेत असल्याचा आरोपही खर्गे यांनी केला आहे.
…काय म्हणाले सीडीएस?
जनरल अनिल चौहान यांनी पाकिस्तानशी झालेल्या अलीकडील लष्करी संघर्षात भारतीय विमानाचे नुकसान झाल्याची कबुली दिली आहे, परंतु 6 भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचा इस्लामाबादचा दावा ‘पूर्णपणे चुकीचा’ असल्याचे म्हटले आहे. ‘ब्लूमबर्ग टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत चौहान म्हणाले की, ‘विमान का गमावले गेले हे शोधणे अधिक महत्त्वाचे आहे, जेणेकरून भारतीय सैन्य आपली रणनीती सुधारू शकेल आणि पुन्हा प्रत्युत्तर देऊ शकेल.’









