तृणमूल काँग्रेस-भाजप आमनेसामने : पोलिसांच्या सुटी रद्द
► वृत्तसंस्था/ कोलकाता
रामनवमीचा सण 6 एप्रिल रोजी आहे, परंतु पश्चिम बंगालच्या 14 जिल्ह्यांमध्ये आतापासूनच तणाव वाढू लागला आहे. याचमुळे राज्य सरकारने 9 एप्रिलपर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. कोलकाता, मुर्शिदाबाद, हावडा, पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर, उत्तर आणि दक्षिण 24 परगणा, सिलिगुडी, जलपाईगुडी, अलीपुरदुआर, कूचबिहारमध्ये अतिरिक्त पोलीस दल आणि शीघ्र कृती दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आले आहेत. यंदा रामनवमीचा सण पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याची तयारी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. रामनवमीचा सण साजरा करण्यापासून तृणमूल काँग्रेसचे ममता बॅनर्जी सरकार रोखत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर तृणमूल काँग्रेसने भाजपवर तणाव वाढविण्याचा प्रयत्न चालविल्याचा आरोप केला आहे.
संबंधित जिल्ह्यांमध्ये मागील दोन दिवसांपासून हिंसेच्या घटना घडल्याने समुदायांदरम्यान तणाव वाढला आहे. रामनवीच्या आड अशांतता फैलावण्याच्या कटाचा गुप्तचर इनपूट आम्हाला मिळाला आहे. कुठल्याही प्रकारचा उपद्रव होऊ नये म्हणून बंदोबस्त वाढविण्यात आला असल्याचे दक्षिण बंगालचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुप्रतिम सरकार यांनी सांगितले आहे.
तर कोलकाता उच्च न्यायालयाने हिंदुत्ववादी संघटनांच्या याचिकेवर सुनावणी करत हावडामध्ये निर्धारित मार्गावर सशर्त मिरवणूक काढण्यास अनुमती दिली आहे. कुठल्याही व्यक्ती मिरवणुकीत शस्त्र घेऊन येऊ नये असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तर उच्च न्यायालयाने पोलिसांना मिरवणुकीवर देखरेख ठेवण्याचा आदेश दिला आहे.
कोलकाता पोलीस आयुक्त मनोज वर्मा यांनीही रामनवमीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत कुणीही शस्त्र घेऊ नये असा आदेश काढला आहे. तर भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या उत्तर बंगालमध्ये अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व समुदायांना अफवांवर लक्ष न देण्याचे आवाहन केले आहे.
राजकारणाला वेग
काही दिवसांपूर्वी मालदा येथील मोथाबाडीमध्ये रामनवमी रॅलीचे प्रात्यक्षिक करण्यात आले होते, ज्यामुळे तणाव निर्माण झाला होता. हिंसाग्रस्त मोथाबाडीचा दौरा करण्यापासून पोलिसांनी भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांना रोखले होते. तर दुसरीकडे विहिंपनने एक लाख श्रीराम महोत्सव आयोजनाची घोषणा केली आहे. विहिंप रामनवमी निमित्त राज्यात दोन हजार रॅली काढणार असून यात 5 लाख लोक सामील होणार असल्याचे सांगण्यात आले. अधिकारी यांनी नंदीग्राममध्ये अयोध्येच्या धर्तीवर एक विशाल राम मंदिर उभारण्याची घोषणा केली आहे. यासाठीचे भूमिपूजन रामनवमीच्या दिनी पार पडणार आहे. रॅलींवर हल्ले झाले तर गप्प बसणार नसल्याचा इशारा भाजपने दिला आहे.
ड्रोनने नजर ठेवण्याची तयारी
रामनवमीच्या दिनी राज्यात यंदा दोन हजार रॅलींची घोषणा झाली असुन दीड कोटी हिंदू यानिमित्त घरातून बाहेर पडत मिरवणुकीत सामील होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य पोलिसांनी अफवांवर नजर ठेवण्यासाठी एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. तर संवेदनशील भागांमधून निघणाऱ्या रॅलींवर ड्रोनने नजर ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे.









