बैलवाड येथील प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांचा आरोप : विकासामुळेच जनतेचा भाजपवर विश्वास
वार्ताहर /बैलहोंगल
काँग्रेस आणि निजद पक्ष व्होट बँकेसाठी राजकारण करत आहेत. हे दोन्ही पक्ष समाजात फूट पाडण्याचे आणि विष पेरण्याचे काम करत आहेत. त्यांच्याकडून फक्त शॉर्टकट राजकारण होत आहे. अशा शॉर्टकट राजकारणावर राज्यातील जनता विश्वास ठेवणार नाही. भाजप कधीही अशा प्रकारचे राजकारण करत नाही. आपल्या पक्षाकडून राज्याच्या विकासाची कामे होत आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस व निजदवर कडाडून टीका केली. या दोन्ही पक्षांकडून कोणतीही विकासकामे होणार नाहीत. लोकांनी याबाबत काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. बैलहोंगलनजीकच्या बैलवाड येथे बुधवारी आयोजित जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते. प्रारंभी पंतप्रधानांनी कित्तूर राणी चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा व बजरंगबली की जय अशा घोषणा देत भाषणाला सुऊवात केली. भाषणाला सुरुवात होताच कार्यकर्त्यांनी उभे राहून जयघोष करत परिसर दणाणून सोडला. भाषणावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, कर्नाटकात भाजपचे सरकार सत्तेवर येणार असल्याचा नारा राज्यभर ऐकू येत असून जनतेने भाजपला बहुमत देण्याचा निर्धार केला आहे. येथील जनतेने स्थिर सरकार आणण्याचा निर्णय घेतला आहे. आज देश विकासाच्या वाटेवर पुढे जात आहे. भाजप सरकार सर्वांच्या समृद्धीसाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे भाजपवर जनतेचा विश्वास आहे. प्रत्येकाला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे भाजपचे उद्दिष्ट असल्याचे ते यावेळी म्हणाले.
… तर कर्नाटक भारतात नंबर वन
कर्नाटकाचा विकास करण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. राज्यात सध्या आधुनिक विमानतळ व आधुनिक रेल्वेस्थानके उभारली जात आहेत. त्यासाठी कर्नाटकात पुन्हा डबल इंजिन सरकार आल्यास हे राज्य भारतात नंबर वन बनणार असून त्यासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.
प्रत्येकाचा विकास हेच भाजपचे ध्येय
प्रत्येक मतदारसंघातील महिला, वृद्ध, युवावर्गात उत्साह संचारला आहे. प्रत्येक कुटुंब डबल इंजिन सरकारच्या योजनांचा लाभ घेत आहे. भाजप सरकार विकास नावाच्या मार्गावर वाटचाल करत आहे. प्रत्येकाचा विकास हेच भाजपचे ध्येय आहे, असे प्रतिपादनही पंतप्रधानांनी केले. यावेळी राज्यसभेचे माजी सदस्य प्रभाकर कोरे यांचेही भाषण झाले. बेळगावच्या खासदार मंगला अंगडी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, आमदार रमेश जारकीहोळी, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. बैलहोंगल, कित्तूर, अरभावी, सौंदत्ती, बेळगाव ग्रामीण, बेळगाव उत्तर व दक्षिण, धारवाड ग्रामीण, कलघटगी, यमकनमर्डी आणि हुक्केरी मतदारसंघातील भाजप उमेदवार व ज्येष्ठ नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
जनताच माझे कुटुंब
काँग्रेसचे रिमोट दिल्लीतील एका शाही कुटुंबाच्या घरात आहे. निजद ही कुटुंबाच्या मालकीची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. पण मोदींना हे कौटुंबीक राजकारण माहीत नाही. सर्व जनताच माझे कुटुंब आहे. लोकांचे सुख-दु:ख माझ्या कुटुंबाच्या सुख-दु:खासारखे आहे, असा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.









