महाराष्ट्रात राजकारण अति आणि विकासकारण, लोककारण कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे. जो तो राजकारणच रेटतो आहे. राज्यात शिंदेशाही असली तरी या सरकारमध्ये मतभेद आहेतच. मतभेद असले तरी मनभेद नाहीत, वगैरे मलमपट्टी होत असली तरी तोंडाळ नेते व मंत्री कमी नाहीत. त्यातूनच रोज नवी नौटंकी होत असते आणि राज्याचे मुख्य प्रश्न, लोकांच्या समस्या आणि प्रशासनावर पकड हे अग्रक्रम बाजूला पडून रोज कुरघोड्या आणि टिकाटिप्पणी यांना उत येत असतो. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या काही मंडळींची सोय लावली ती लावताना मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहणाऱ्या चंद्रकांतदादा पाटील यांना पुण्यातून उचलून सोलापूरात ढकलले. तेथे ते किती पचनी पडतात हे बघायचे पण, भाजपाचे दिग्गज नेते, प्रदेशाध्यक्ष, महसूलसारखे वजनदार खाते सांभाळणारे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री अशी एका पाठोपाठ एक मोरपिसे गळून ते आता दुष्काळी सोलापूरचे पालकमंत्री झाले आहेत. फडणवीस यांनी पक्षातील जे सहकारी त्यांच्या नेतृत्वाला आव्हान देत होते ते एक एक करत कमजोर केले. पंकजा मुंडे, चंद्रकांतदादा पाटील, विनोद तावडे आणि एकेकाळी एकनाथ खडसे यांना बरोबर नामोहरम केले. चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद काढून तेथे अजित पवारांना नियुक्त करणे यात बरेच राजकारण सामावले आहे. पालकमंत्रीपदाचा वाद व निर्णय बराच काळ लांबला होता. अजित पवार त्यामुळे नाराज होते. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते गैरहजर होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन भाजपा हायकमांड अमित शहांशी चर्चा केली. अमित शहांना महाराष्ट्रातून अधिकाधिक खासदार हवे आहेत. जोडीला मुंबई महापालिका हवी आहे.
भाजपाने पंचेचाळीस प्लस असे उद्दीष्ट ठेवले असले तरी वातावरण पोषक नाही. या पार्श्वभूमीवर वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. भाजपच बिग बॉस अशी नवी घोषणा भाजप नेते मांडताना दिसत आहेत. त्यामागे मुंबई महापालिकेत व राज्याच्या लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचा तिढा आहे. अमित शहा यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी बारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या सुधारित यादीत अजितदादाच पुण्याचे खरे दादा हे जसे स्पष्ट झाले आहे तसेच कोल्हापूरचे पालकमंत्रीपद हसन मुश्रीफ आणि बीडचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंना देण्यात आले. नाशिक, सातारा आणि रायगड येथील वाद कायम राहिल्याने या प्रश्नाचे पूर्ण समाधान लाभलेले नाही. शिंदे, फडणवीस व पवार हा तिढा कसा सोडवतात हे बघावे लागेल. पालकमंत्री हा अनेक अर्थाने मोठे पद आहे. निधीवाटप हे प्रकरण आणि विविध शासकीय समित्यांच्या शिफारशी पालकमंत्र्यांच्या हातात असतात. प्रशासन हे पालकमंत्र्यांच्या चालीने चालत असते. पालकमंत्र्यांच्या सुधारीत यादीत अजित पवार गटाचे सात मंत्री आहेत. राज्यात दहीहंडी, गणेशोत्सव पार पडला. मान्सूनचा पाऊस बऱ्यापैकी पडला. नागपुरात या पावसाने जो तडाखा दिला तो पर्यावरण राखण्यात आपण किती मागे आहोत हे दाखवणारा होता. पक्ष पंधरवडा सुरू आहे. या काळात फारसे नवे काही केले जात नाही. बाजारातही मंदी असते. आता घटस्थापना व मग दसरा, दिवाळी ओघानेच दसरा मेळाव्याचे वेध सर्वांना लागले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा, शिवसेना शिंदे गटाचा मेळावा याच जोडीला पंकजा मुंडे यांचा भगवानगडावरचा मेळावा, रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांचे नागपुरातून स्वयंसेवकांना मार्गदर्शन आणि आरेवाडीत गोपीचंद पडळकर वगैरे धनगर समाजातील नेते घेत असलेला मेळावा अशी दसऱ्याची राजकीय रोषणाई असते. सारेच पक्ष व्यासपीठावर एक बोलतात आणि सत्तेसाठी तडजोडी करतात हे मतदारांच्या लक्षात आले आहे. मेळाव्याला भाड्याने माणसे आणली जातात असे आरोपही होतात आणि त्यात तथ्य आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यात अनेक सारे विषय आहेत. राज्यातील आरोग्य यंत्रणा आजारी पडली आहे. माणसांचे बळी जात आहेत. आरक्षणाचे विषय तीव्र आहेत. आरक्षण मिळावे म्हणून विविध जातींनी तगड्या संघटना उभ्या केल्या आहेत. या मतदारपेट्या डावलणे कुणा राजकीय पक्षांना शक्य नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा तीव्र रूप धारण करू शकतो. धनगर व ओबीसी आरक्षणाचा प्रश्नही तीव्र आहे. राज्यातील शेतकरी वर्ग अडचणीत आहे. पूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे.
नुकताच झालेला पाऊस आणि धरणामधून झालेला पाणी संचय यामुळे थोडे समाधान असले तरी खरीपातील काही पिके जुलैमध्ये लावली आहेत ती निघण्यास नोव्हेंबर महिना संपणार आहे, अशावेळी रब्बी हंगाम कसा यशस्वी करायचा हा प्रश्न आहे. यंदा उसाचीही टंचाई आहे. शेतकरी संघटना 400 रूपयेच्या हप्त्यासाठी आक्रमक आहे. आणि कारखान्याला ऊस मिळावा म्हणून विदेश यात्रेची आमिषे दाखवली जात आहेत. यंदा थंडी फारशी नाही असा अंदाजही व्यक्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे प्रश्न, आरक्षणाचे प्रश्न, आमदारांची पात्रता, अपात्रता असा बराच दारूगोळा, दसरा मेळाव्यातून उडवला जाईल, राजकीय धुळवड होईल. पण, लोकांच्या प्रश्नांचे काय याचे उत्तर सापडत नाही. मुख्यमंत्र्यांनी सणासुदीसाठी रेशनवर आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली आहे. पण, शिधापत्रिकेवर कसे धान्य वितरीत होते ते खाण्यायोग्य असते का याची तपासणी झाली पाहिजे, दुर्दैवाने मोठ्या घोषणा आणि वेळ मारून सत्ता रेटणे सुरू आहे. राज्यकर्त्यांनी देव वाटून घेतले आहेत. पंढरपुरात आषाढीची पूजा मुख्यमंत्री करतात कार्तिकीची पूजा उपमुख्यमंत्री करतात. यंदा दोघे उपमुख्यमंत्री दोन पक्षाचे आहेत ते एकत्रित पूजा करणार की कुणी एकटा हे ठरायचे आहे. पण, चर्चा सुरू आहे. भाजपातील अस्वस्थता दडून नाही. पंकजा मुंडे यांनी काढलेली स्वबळावरची यात्रा आणि घेतलेली भूमिका चर्चेचा विषय बनली आहे. पंकजा मुंडे कोणती भूमिका घेतात याच जोडीला भाजपाचे वाचाळ पुढारी पक्षाला कुठे नेऊन ठेवतात हे बघावे लागेल. आता सर्व नवे पालकमंत्री पदाचा कार्यारंभ करतील. पण, त्यातून लोकांचे प्रश्न सुटणार हा प्रश्न आहे. राज्यात राजकारण अधिक आणि विकासकारण कमी अशी स्थिती आहे. ती फारशी शोभादायक नाही.








