जगभर नाताळचा सण आणि नव वर्षाच्या स्वागताची धूम सुरु झाली असताना भारतात आणि महाराष्ट्रात राजकारणाची पातळी रसातळाला गेल्याचे अनुभवायला येते आहे. 25 डिसेंबरला नाताळ किंवा ख्रिसमस हा ख्रिस्ती बांधवांचा महत्वाचा सण असतो. आपल्याकडेही भारतीय लोक वेगवेगळी नववर्षे आणि त्या वर्षाचा पहिला दिवस यांचे स्वागत करत असतात. चैत्र पाडवा असतो. दिवाळी पाडवा असतो, आर्थिक वर्ष असते, इंग्रजी नववर्ष असते. पारशी नववर्ष असते. उत्सवाला आणि इव्हेंटला तोटा नसतो. जगभर चंगळवाद बोकाळला आहे. खवय्ये आणि पिवय्ये वाढत आहेत. नववर्षाच्या निमित्ताने फुगे सोडून, फटाके फोडून, केक कापून आणि पार्टी करुन मंडळी मजा करत असतात. हे आपले नववर्ष ते त्यांचे असे कितीही म्हटले आणि पटले तरी वर्ष अखेरीस जगभरातील समुद्रकिनारे, हॉटेल्स, बार आणि टेरेस गुलाबी थंडीत थिरकत असतात. क्रूजवर पार्टी होत असतात. या पाटर्य़ांना गुन्हेगारी पार्श्वभूमिही असते. यंदाही त्यांची तयारी झाली आहे. गोवा, कोकण, मुंबईचे समुद्रकिनारे सजले आहेत. सुट्टीसाठी दूरदूरवरुन पर्यटक व हौशी मंडळी डेरेदाखल झाली आहेत. कोव्हिडनंतरचा मंदीत एक संधी आणि व्यापार उद्योगाला चालना म्हणूनही या इव्हेंटकडे बघितले जाते आणि त्यात वावगे नाही पण यानिमित्ताने व्यसनाधिनता आणि चंगळवाद बोकाळतो आहे. याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. 25 डिसेंबर हा भारतीयांसाठी आणखी एक गोष्टीमुळे विशेष दिवस आहे. भारताचे माजी पंतप्रधान आणि कवी मनाचे ओजस्वी वक्ते अटलबिहारी वाजपेयी यांचा हा जयंतीदिन आहे. जय जवान जय किसान, जय विज्ञान असा नारा देणारे आणि पोखरणमध्ये अणुचाचणी करुन हिंदुस्थानला शक्तीमान बनवणारे अटलजी सर्वांना प्रेरणादायी असे व्यक्तिमत्व होते. भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने त्यांना गौरवण्यात आले तथापि ज्याच्या डोक्यावर कधीही लाडवाची बुट्टी नसते अशी मंडळी या भारतरत्नावरही शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका प्रयत्नात एका काँग्रेस नेत्याने अटलजी इंग्रजांचे खबरे होते अशी टीका केली. अत्यंत निषेधार्थ अशी ही टिप्पणी केवळ आणि केवळ राजकारणातूनच झाली आणि या टिप्पणीला कुणी धूप घालणार नाही हे स्पष्ट आहे. पण लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही कोणाला निवडून देतो, निवडून दिलेली आणि विविध राजकीय पक्षात स्थिरावलेली स्वतः नेते म्हणवून घेणारी माणसे कशी वागतात, बोलतात हे तपासण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळखंडोबा झालेलाच आहे. रोज गमतीजमती सुरु आहेत. पण राष्ट्रीय पातळीवरही फार काही चांगले चित्र नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माफीवीर म्हणण्याची पातळी गाठली गेली. लहान उंचीची मोठय़ा पदावर बसलेली माणसे रोज तेच ते धुणे धुत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात खोकी, पक्षांतर, आरोप-प्रत्यारोप, निलंबन, करेक्ट कार्यक्रम, शिवराळ भाषा आणि बेभान प्रवक्ते यांना लोक कंटाळलेले आहेत, लोकमान्य टिळक मंडालेतून सुटल्यानंतर त्यांचे स्वागत व्हावे तसे राजकारणात घोटाळे, गैरव्यवहाराचे आरोप, चौकशा झालेल्या व अटकेतून जामिनावर सुटलेल्या महाभागांचे जल्लोषी स्वागत होते आहे, त्यांच्या स्वागताच्या बाईक रॅली काढल्या जात आहेत. स्वागताचे फलक व पोष्टर झळकत आहेत हे सारे राजकारणाला, समाजकारणाला आणि नितीमत्तेला शोभणारे नाही. राजकारण कालचे बरे असे म्हणायची रोज वेळ येते आहे. नागपुरात चाललेल्या हिवाळी अधिवेशनात अशीच धुळवड सुरु आहे. या अधिवेशनात विदर्भालाही न्याय मिळालेला नाही आणि जनतेलाही न्याय नाही. अधिवेशनात शिंदे सरकार मधील चार मंत्र्यांवर गंभीर आरोप झाले आहेत. सरकार कोणाचेही असो कार्यपद्धती व आरोप तेच ते आहेत. कालचा दिवस बरा अशी राजकारणाची रोज नीच्चांकी पातळी गाठली जाते आहे. भारतरत्न अटलजी हे जाज्वल्य देशभक्तीचे आणि राष्ट्रासाठी सर्वस्व देणारे नेते म्हणून ओळखले जात. त्यांची विद्वत्ता, भाषाशैली, अभ्यास, राष्ट्रभक्ती यांचा हिंदुस्थानला नेहमीच उपयोग झाला आहे. काँग्रेस पक्ष केंद्रात सत्तारुढ असताना वाजपेयी विरोधी नेते होते पण त्यावेळीही देशांचे प्रतिनिधीत्व करण्याची आणि भारताची समर्थ बाजू आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. देशभर त्यांच्या जयंतीचा सोहळा होत असताना काँग्रेसच्या नेत्याने वाजपेयी हे इंग्रजांचे खबरे होते असा निचपणाचा आरोप केला. काँग्रेसच्या दरबारी राजकारणात आपला स्वार्थ साधावा इतक्याच नीचवृत्तीने ही चिखलफेक झाली. पण काँग्रेसचे युवराज राहूल गांधी यांनी 25 डिसेंबरला अटलजी यांच्या समाधीस्थळी जाऊन कृतज्ञता व्यक्त केली, अभिवादन केले हेही थोडके नसे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही आपल्याच पक्षातून अटलजीच्यावर झालेला आरोप चुकीचा आहे. पुढे येऊन म्हटले व काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांचे समन्वयक व नेते गौरव पांधी यांनी ट्विट करुन वाजपेयी व रा. स्व. संघावर ब्रिटीशांचे गुप्तहेर म्हणून आरोप केला पण याच पटोले यांनी मोदींवर केलेल्या वक्तव्यामुळे गतवर्षी मोठा वाद पेटला होता. नितीन गडकरी यांनी नाना पटोले यांच्यावर आक्षेप घेतला होता. मी मोदींना मारु शकतो असे पटोले तेव्हा म्हटले होते पण ते नंतर म्हणाले, मोदी म्हणजे नरेंद्र मोदी नव्हे. माझ्या मतदार संघातील मोदी नावाचा एक माणूस आहे. एकूणच राजकारणात गमतीजमती सुरु आहेत. राजकारणाचे गांभीर्य आणि दर्जा घसरताना दिसतो आहे. मतदारांना, नागरिकांना काहीच लक्षात येत नाही अशा भ्रमात तथाकथित नेतेमंडळी आहेत पण हा भ्रम फारकाळ टिकणारा नाही. तूर्त सर्वच पातळीवर नीतिमूल्यांची, परंपरांची आणि उच्च पदावरील मान्यवरांची, महापुरुषांची अवहेलना सुरु आहे. त्यामध्ये लहानांपासून मोठय़ांपर्यंत अनेकांचा सहभाग आहे. या मंडळींनी साधु संतांनाही सोडलेले नाही आणि समाजसुधारकांना लक्ष केले आहे. यातून काय साधायचे आहे हे अनाकलनीय आहे. तूर्त राजकारण चुलीत गेले तरी हरकत नाही पण देश, देशातील महापुरुष यांचा सन्मान ठेवला पाहिजे. उचलली जीभ लावली टाळय़ाला हा प्रकार थांबायला पाहिजे.
Previous Articleसंकल्पांचे कॅनव्हास…
Next Article कोयनावसाहतीत चोरटय़ांचा धुमाकूळ
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








