पालकमंत्र्यांची बैठकीत सूचना : महानगरपालिकेतील घडामोडींमुळे शहरातील जनतेत तीव्र नाराजी : विकासासाठी संघटितपणे काम करण्याची गरज
बेळगाव : महापालिकेमधील राजकारण आता चांगलेच तापू लागले आहे. सत्ताधारी तसेच विरोधकांमध्ये सुरुवातीपासूनच विविध प्रश्नांवरून जुंपू लागली आहे. महापालिकेला बरखास्तीचा उल्लेख असलेली नोटीस आली, त्यानंतर त्या नोटिसीला उत्तर दिल्यावरून वातावरण आणखी तापले आहे. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये यावरून मोठी खडाजंगी झाली. हे राजकारण सुरू असले तरी शहरातील जनता मात्र विविध समस्यांनी ग्रासली असून त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
स्मार्ट सिटीअंतर्गत विकास केला, असे सांगण्यात येत आहे. मात्र, स्मार्ट सिटीची कामे अजूनही प्रलंबित आहेत. ती कामे कधी पूर्ण होणार? याचबरोबर यामधील बहुसंख्य कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप यापूर्वी करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेमध्ये सुरू असलेल्या राजकारणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अधिकाऱ्यांना काम करू देणे गरजेचे आहे. मात्र त्यांना विविध प्रश्नांवरून वेठीस धरण्याचा प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून सुरू असल्याचा आरोप विरोधी गटाचे नगरसेवक करत आहेत.
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित राहून काही मुद्दे मांडले. त्यानंतर अवघ्या पाचच मिनिटांत ती सभा आटोपती घेण्यात आली. यावेळी राष्ट्रगीताचाही अवमान झाला, असे आरोप आता सुरू झाले आहेत. यानंतर आमदार राजू सेठ यांच्या महापालिकेतील कार्यालयामध्ये विरोधी गटाच्या नगरसेवकांनी तातडीने बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये नगरसेवकांनी समस्यांचा पाढाच वाचला. त्यामुळे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी ज्या समस्या आहेत, त्या समस्या तुम्ही वारंवार मांडत रहा. याबाबत सरकारकडे पाठपुरावा करून समस्या सोडविण्याबाबत प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
शहरातील 58 वॉर्डांमधील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी विशेष निधी सरकारकडून दिला जाईल. मात्र, पूर्वी केलेल्या कामांबाबतचा संपूर्ण अहवाल राज्य सरकारकडे पाठविणे गरजेचे आहे. कचऱ्याची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी झाली असली तरी त्यामध्ये नियमितता असणे महत्त्वाचे आहे. अन्यथा पुन्हा कचऱ्याची समस्या गंभीर बनू शकते, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये वेगवेगळे ठराव केले जातात. मात्र, त्या ठरावानंतर पाठपुरावा केला जात नाही. त्यामुळे कामे अर्धवट रहात आहेत. अधिकाऱ्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. मात्र, काहीजण त्यांच्यावर दबाव आणत असल्याचे दिसून येत आहे. सध्या मनपातील अधिकाऱ्यांबरोबरच कर्मचारीही तणावामध्ये आहेत. त्यामुळे कामे प्रलंबित आहेत. आम्हाला प्रत्येक नगरसेवकाला निधी मिळणे गरजेचे आहे. मात्र, आतापर्यंत केवळ आश्वासने देण्यात आली आहेत. निधी मिळाला नाही, असेही पालकमंत्र्यांना विरोधी गटाच्या नगरसेवकांनी यावेळी सांगितले.
समप्रमाणात निधी देण्याचे आश्वासन
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून कोणत्याही कामाची सुरुवात झाली पाहिजे. अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणीही लक्षात घेतल्या पाहिजेत. केवळ आमची सत्ता आहे आणि आम्हालाच निधी मिळाला पाहिजेत, असे कोणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. सर्वसामान्य जनतेचाच पैसा विकासासाठी खर्च केला जातो. त्यामुळे तो सर्व ठिकाणी समप्रमाणात दिला पाहिजे. त्यासाठीच अधिकारी आराखडा तयार करून आपला अहवाल देत असतात. मात्र, आपलाच रेटा पुढे ओढण्याचा प्रयत्न करत असतील तर ते चुकीचे आहे. प्रत्येक वॉर्डामध्ये समान निधी गेला पाहिजे. उत्तर मतदारसंघ असो किंवा दक्षिण मतदारसंघ असो, दोन्ही ठिकाणी असलेल्या वॉर्डांनुसारच निधी यापुढे दिला जाईल, असे आश्वासन नगरसेवकांना पालकमंत्र्यांनी दिले आहे.









