शिवसेना ठाकरे गटाची सध्या अस्तित्वाची लढाई सुरू असून मुंबईप्रमाणेच बालेकिल्ला असलेला कोकणही त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणूनच त्याठिकाणी घाव घालण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचा प्रयत्न आहे. त्यामुळेच की काय गेल्या तीन महिन्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी रत्नागिरी, सिधुदुर्गमध्ये तब्बल पाच दौरे केले. या दौऱ्यांची फलनिष्पत्ती काय ती पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत दिसेल, पण तूर्तास सध्या दोन्ही शिवसेनेंतर्गत नेतेमंडळी एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप, टीका आणि टिप्पणीने कोकणातील वातावरण पुरते गढूळ बनले आहे.
शिमगोत्सव सरत आला तरीही राजकीय धुळवड मात्र अजूनही सुरूच आहे. मात्र यातून जनतेच्या वाट्याला नेमके काय? हा महत्त्वाचा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहिला आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दोन आठवड्यापूर्वीच खेडच्या गोळीबार मैदानावर जाहीर सभा झाली.निमित्त होतं राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांच्या शिवसेना प्रवेशाचं. राज्यातील सत्तांतरानंतर ठाकरे प्रथमच कोकणात आल्याने त्यांनी विशेषत: शिंदे गटात सामील झालेले माजी मंत्री रामदास कदम अण्णा त्यांचे आमदार चिंरंजीव योगेश यांच्या नेहमीप्रमाणे गद्दारीचा मुद्दा लावून धरत, आगामी निवडणुकीत यांना संपवा, असा थेट आदेश दिला. त्यामुळे डवचल्या गेलेल्या रामदास कदम यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची याच गोळीबार मैदानावर ‘उत्तर सभा’ होईल, असं त्याचवेळी जाहीर केलं आणि तशी रविवारी सभा घेतली.शिवसेनेचा बालाकिला असलेल्या कोकणामध्ये शिरकाव करण्याच्या दृष्टीने आणखी एक संधी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील या सभेला आतिशय उत्तमप्रकारे नियोजन करून कदम पिता-पुत्रांनी सभेला भरपूर गर्दी जमा केली. तसे पाहिले तर ही ‘उत्तर सभा’ असल्याने ठाकरे यांच्या सभेच्या गर्दीशीही या सभेच्या गर्दीची तुलना झाली. गर्दीचा विचार केला तर मुख्यमंत्र्यांच्या सभेला थोडीफार अधिक गर्दी असेल, पण हली गर्दी जमवण्याचं तंत्र विकसित झालं आहे. त्यामुळे त्यातून फार काही अंदाज येत नाही.
दोन आठवड्यांपूर्वी याचा ठिकाणी झालेल्या ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर खरं तर या सभेत श्रोत्यांना राजकीय जुगलबंदीची अपेक्षा होती, पण त्याऐवजी शिंदे यांनी विकासाची रटाळ पॅसेट लावल्याने श्रोते काहीसे कंटाळले. ठाकरे आणि शिंदे यांच्या सभेतील फरक आता कार्यकर्तेच अधोरेखित करीत आहेत. ठाकरे सभेला येण्यापूर्वी व्यासपिठावरील उपस्थित नेत्यांची भाषणे उरकलेली असतात. त्यामुळे सभेला आल्यानंतर ठाकरे लगेचच भाषण सुरू करून हल्लाबोल करतात. याउलट परिस्थिती ही शिंदे यांच्या सभेत असते. मुख्यमंत्री सभेला आल्यानंतरही पाच-सहा नेत्यांची भाषणे होतात. त्यामुळे मुळातच मैदानावर चार वाजल्यापासून बसलेले श्रोते शेवटी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी कंटाळलेले असतात. कोकणातला ठाकरेंचा मतदार आपल्याकडे खेचायचा असेल तर मुख्यमंत्र्यांना यापेक्षा वेगळी शैली आत्मसात करण्याची गरज आहे.
गोळीबार मैदानावरही तेच घडले. मैदानातील गर्दीच्या वातावरणाचा लाभ उठवत मुख्यमंत्र्यानी भाषणाच्या सुरूवातीला राजकीय सूर चांगल्याप्रकारे लावला. पातळी ढळू न देता उद्धव ठाकरे यांचा तथाकथितत नाकर्तेपणा अण्णा भ्रष्टाचारावर बोट ठेवत त्या पक्षातून बाहेर पडण्याशिवाय काहीही पर्याय कसा शिलक रा हिला नव्हता, हे त्यांनी पुन्हा एकदा ठसवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर ‘आपलं सरकार’ने अल्प कालावधीत राज्यातील जनतेसाठी कितीविविधप्रकारच्या योजना राबवल्या आहेत हे मुख्यमंत्री सांगू लागले इथूनच त्यांची सभेवरची पकड निसटली. कारण हे मुद्दे त्यांनी कागदावर लिहून आणले होते. त्यामध्ये पुनरावृत्ती होती, ते वाचताना अडखळत भाषण करत होते. शेवटी शेवटी तर कोकणच्या कास योजनांचा विषय आल्यावर त्यांनी माईकवरूनच, अरे तो कोकणच्या योजनांचा कागद कुठे गेला, असं विचारलं. मग कोणीतरी तो कागद पुढे सरकवला आा†ण यापूर्वीच्या दौऱ्यांमध्ये सांगितलेली आणि अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या योजनांची यादी शिंदे यांनी वाचून दाखवली.
मुख्यमंत्र्याच्या भाषणात कोकण विकासाच्यादृष्टीने नवा मुद्दा म्हणजे कोयना अवजलाचा. कोयनेच्या वीजनिर्मितीनंतर वाशिष्ठी नदीमार्गे समुद्राला वाया जाणारे पाणी कोकणात फिरवण्याची रामदास कदम यांची महत्वकांक्षी योजना होती. पाच वर्षापूर्वी त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले होते. ज्यावेळी तत्कालिन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी हे अवजल मुंबईला नेण्याची घोषणा केली त्यावेळी कदम यांनी त्याला विरोध केला होता. त्यानंतर बारगळलेला हा विषय मुख्यमंत्र्यांनी या सभेत पुन्हा बाहेर काढून याप्रश्नी लवकरच बैठक घेण्याचे जाहीर केले.
तसे पाहिले तर कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. गेल्या 20 वर्षाहून अधिककाळ याच कोकणने साध्या ग्रामपंचायतीपासून ते आमदार, खासदारकीपर्यत शिवसेनेला भरभरून दिले आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेनेमध्ये राज्य पातळीवर मोठी फूट पडून सत्तांतर झाले. यामध्ये शिवसेनेच्यादृष्टीने अभेद्य असलेल्या कोकणातही मोठा हादरा बसला. रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि रायगड या तीन जिल्हयांचा विचार केला तर पंधरा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये शिवसेनेचे तबल नऊ आमदार होते. आता त्यातील सहा आमदार हे शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाले. त्यामुळेच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कोकणातील आपले अस्तित्व टिकवण्याची धडपड सुरू केली आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांनाही कोकणात आपले अस्तित्व नव्याने प्रस्थापित करायचे असल्याने त्यांनीही प्रयत्न सुरू केले आहेत.
कोकणच्या विकासासाठी आपण जास्त संवेदनशीलपणे लक्ष घालत असल्याचे दाखवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी गेल्या अडीच-तीन महिन्यांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिह्यांमध्ये पाचवेळा विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. पहिला दौरा हा गेल्यावर्षी 16 डिसेंबर रोजी रत्नागिरी शहरात झाला. राज्याचे उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांनी शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुलामध्ये भव्य मेळावा आयोजित करून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. त्यानंतर राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आयोजित वार्षिक मेळाव्याच्या निमित्ताने शिंदे पुन्हा रत्नागिरीत आले होते. 5 फेब्रुवारीला चिपळूणच्या लोककला महोत्सवाला ते येणार होते. मात्र ऐनवेळी काही तांत्रिक कारणामुळे मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन हजेरी लावून कोकणातील लोककला जपण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली.
सिंधुदुर्ग जिह्यात तर फेबुवारी महिन्यात लागोपाठ दोनवेळा मुख्यमंत्री शिंदे येऊन गेले. यापैकी एक दौरा आंगणेवाडी यात्रा, तर दुसरा दौरा प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशन निमित्ताने होता. त्यानंतर रविवारी शिवसेना नेते रामदास कदम यांनी खेडमधील गोळीबार मैदानात आयोजित केलेल्या उत्तर सभेच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांनी तीन महिन्यांतील आपला पाचवा दौरा केला. शिंदे यांच्याबरोबरच मंत्री उदय सामंत आणि दीपक केसरकर यांचेही संघटना वाढीवर लक्ष आहे. मात्र मंत्री आणि थेट मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर प्रयत्न करूनही या दोन्ही जिह्यांमधील ठाकरे शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मात्र आपल्या जागी कायम असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे सत्ताधारी गटामध्ये अस्वस्थतेचं वातावरण आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर खरा परिणाम दिसू लागेल अशी चिन्हे आहेत.








