मिळालेल्या यशाची भाजपकडून भलावण, काँग्रेकडून त्रुटीशोधन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राजधानी दिल्लीत रविवारी जी-20 संघटनेची शिखर परिषद भारताच्या नेतृत्वात यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता राजकीय रस्सीखेच सुरू झाली आहे. भारताने आपल्या नेतृत्वकाळात या संघटनेला अधिक सकारात्मक आणि अधिक समावेश बनविण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. भारताच्या नेतृत्वाचे साऱ्या जगाकडून कौतुक होत आहे. याचा राजकीय लाभ निवडणुकांमध्ये भाजपला मिळू शकतो असे राजकीय तज्ञांचे मत आहे. तर काँग्रेसकडून त्रुटी शोधण्याचे कार्य सुरू आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश न•ा यांनी ही परिषद अभूतपूर्व पद्धतीने यशस्वी करुन दाखविल्यासंदर्भात केंद्र सरकारची प्रशंसा केली आहे. यापुढे होणाऱ्या विधानसभा निवडण़ुका आणि 2024 मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक यांच्यात या यशाचा मुद्दा बनविण्याचे संकेत या नेत्यांनी दिले. या परिषदेमुळे भारताचे आंतरराष्ट्रीय महत्त्व किती वाढले आहे, याचे प्रत्यंतरच आले आहे. त्यामुळे देशातही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजप-रालोआ सरकार यांची लोकप्रियता आणखी वाढल्याचा विश्वास भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे यश
यंदाच्या वर्षी जी-20 चे नेतृत्व भारताकडे होते. हे उत्तरदायित्व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समर्थपणे आणि प्रभावीपणे केले. त्यांची दूरदृष्टी आणि कल्पकता यांचे शिखर परिषदेला उपस्थित सर्व राष्ट्रप्रमुखांनी मनापासून कौतुक केले. यामुळे जगाच्या पटलावर भारताला नवी झळाळी प्राप्त झाली. भारताचे महत्त्व जगाने मान्य केले, हा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपने सज्जता केली आहे.
काँग्रेसची टीका
भाजपने या परिषदेचा राजकीय उपयोग चालविला आहे, अशी टीका काँग्रेसकडून होत आहे. पंतप्रधान मोदींना या परिषदेच्या यशाचे श्रेय देण्याचे काम राजकीय हेतूने केले जात आहे. वास्तविक केंद्र सरकारने मोठे काहीही केलेले नाही. देशातील समस्यांकडून लोकांचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी या परिषदेतील कथित यशाचा उपयोग केला जात आहे असा सूर अनेक काँग्रेस नेत्यांनी लावला.
बायडेन यांच्या विधानाचा उपयोग
पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करताना वृत्तपत्रांचे स्वातंत्र आणि मानवाधिकार हे मुद्देही उपस्थित करण्यात आले, असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी व्हिएतनाममध्ये केले आहे. यावरुन भारतात या मुद्द्यांसदर्भात परिस्थिती ठीक नाही, असा अर्थ काँग्रेसने काढला असून अमेरिकेने भारताला ही समज दिलेली आहे, असा प्रचार त्या पक्षाच्या नेत्यांनी चालविला आहे.
संयुक्त निवेदनाचे यश
रशिया किंवा कोणताही देश दुखावला जाणार नाही, अशाप्रकारे संयुक्त निवेदनाची रचना कशी करावी हा पेच या परिषदेसमोर प्रारंभापासून होता. अगदी शिखर परिषदेचा प्रथम दिवस पार पडत असतानाही ही स्थिती होती. मात्र, नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन सर्वांना मान्य होईल अशा आशयाच्या प्रस्तावाची रचना केली. एका बाजूला रशियाला न दुखावता दुसऱ्या बाजूने जगाचा युद्धविरोधी संदेश संबंधितांपर्यंत पोहोचविण्याची तारेवरची कसरत भारताला नेता या नात्याने करावी लागणार होती. ती अगदी शेवटच्या क्षणी साध्य करण्यात आली. परिणामी, भारताचे महत्त्व आणखी वाढले. रशियाचा टीकात्मक उल्लेख नसलेले संयुक्त निवेदन येईल अशी त्या देशाचीही अपेक्षा नव्हती. पण हा समतोल योग्य रितीने साधल्याने भारताने एका दगडात अनेक पक्षी मारले, अशा प्रतिक्रिया आल्या. पंतप्रधान मोदींचे हे यशही भाजपच्या पथ्यावर पडेल का, अशी चर्चा सुरू आहे. एकंदर ही परिषद भारताच्या राजकारणातही महत्त्वाची भूमिका साकारणार, अशी चिन्हे विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांच्या हालचालींवरुन दिसत आहेत.









