सचिन बरगे कसबा बावडा
लग्नसराई, जावळ, बारसे अशा कार्यक्रमात सध्या आमंत्रित राजकीय नेत्यांची उपस्थिती आवर्जून ठरलेली .आपल्या कार्यक्रमात नेते आले म्हणून पाहुणे खुश तर या मंगल समयी जास्तीत जास्त लोकांचा (मतदारांचा) संपर्क झाल्यामुळे नेतेही खुश. घरगुती कार्यक्रमांनाही नेत्यांना आमंत्रित करण्याचा ट्रेंड सध्या सुरू झाला असून नेतेही अशा ठिकाणी आपले मार्केटिंग करून घेताना दिसत आहेत.
सध्या लग्न सराई म्हंटलं की प्रशस्त मंगल कार्यालय, उत्कृष्ट जेवण, नवऱ्यासाठी घोडा, नवरीला पालखी, दोन्ही वऱ्हाडी मंडळींना फेटे, आधुनिक बँड, वधू- वराचे फोटो असलेले डिजिटल फलक तसेच दोन्ही पक्षाकडून केलेला वारेमाप खर्च हा हौसेखातर केला जातो. पाहुण्यांबरोबर नेत्यांनाही आमंत्रण देण्याचा ट्रेंड सध्या सुरू आहे. यात काही नेते वेळात वेळ काढून समारंभास आवर्जून हजेरी लावतात. हेच नेते वधू – वरांना शुभाशीर्वाद देण्याबरोबर आपले मार्केटिंग करताना दिसत आहेत. काही उत्साही कार्यकर्तेही यावेळी आपल्या नेत्याबरोबर सेल्फी काढतात. लग्नादिवशी वेळ नाहीच मिळाला तर दुसऱ्या दिवशी त्या नवदांपत्यांना त्यांच्या घरी जाऊन आशीर्वाद देतात.
पण वधू – वर पक्ष हे एकाच राजकीय गटाचे असतील तर नेत्यांना काही अडचण नसते. पण ते जर दोन्ही विरोधी गटाचे असतील तर नेत्यांची फार दमछाक होते. तो आधी का मी आधी अशी नुसती चढाओढ असते. काही ठिकाणी तर नेत्याला त्या कार्यकर्त्यांची फारशी ओळखही नसते पण आपल्या मतदार संघात समारंभ आहे ना मग आवर्जून जायचं अशी परिस्थिती असते. इतरवेळी मात्र कामानिमित्त आलेल्या त्या कार्यकर्त्याकडे कधी बघितलही जात नाही.पण त्याने दिलेल्या आमंत्रणाला आवर्जून हजेरी लावणार.
निवडणुकीच्या तोंडावर अशा समारंभांना वेळात वेळ काढून हजेरी लावून नेते मंडळी आपले मार्केटिंग करून घेताना
काही दिवसांपूर्वी कसबा बावड्यात झालेल्या लग्न समारंभात राजकीय नेत्यांचे कट्टर समर्थक दिसून आले. यावेळी वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी काँग्रेसचे आमदार व भाजपचे माजी आमदार आले होते. आलेल्या दोन्ही नेत्यांचे स्वागत लग्न मंडपातील पाहुणे मंडळींनी एकत्र येऊन न करता आपल्याच पक्षातील नेत्याचे स्वागत केले. विरोधी गटाच्या नेत्याकडे साधे बघितलंही नाही.
प्रत्येकांनी आपल्याच नेत्याबरोबर सेल्फी काढला.यावरून कट्टर समर्थक निवडणुकीपूरतेच न राहता लग्न समारंभातही पहायला मिळाले.