महाराष्ट्रात राहून सर्वाधिक भाष्य करणाऱ्या आणि राजकीय उलथापालथीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावलेला आहे. त्याचबरोबर प. बंगालपुरता सिमीत असलेला तृणमूल काँग्रेस तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही राष्ट्रीय दर्जा गमावलेला आहे. या उलट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा ‘आप’ पक्ष बराच फोफावला, वाढला व अनेक राज्यांमध्ये रुजला देखील. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे राजकीय वजन दिवसेंदिवस घटत आहे. एक काळ असा होता की लोकप्रियतेच्या ते अत्यंत सर्वोच्च शिखरावर देखील होते. पंतप्रधानपदासाठी त्यांच्या नावाचाही विचार चालला होता. काँग्रेसकडून फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला आणि पुन्हा त्याच पक्षाबरोबर आघाडी करून महाराष्ट्रात, केंद्रात संसार थाटला. मात्र ही स्वतंत्र चूल कशाला मांडली होती? हा प्रश्न तसाच राहिला. महाराष्ट्रात काँग्रेसबरोबर युती करून काँग्रेसलाच पोखरण्याचा डाव या पक्षाच्या अंगलट आला. तिथूनच महाराष्ट्रात बरीच पडझड झाली आणि हा पक्षदेखील घराणेशाहीमध्ये गुरफटून गेला. आज महाराष्ट्र वगळता राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्याही राज्यात स्थान नाही. मेघालयात अलीकडे झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे तीन आमदार विजयी झाले खरे, तिघांनीही भाजप आघाडी सरकारला पाठिंबा दिला. महाराष्ट्रातदेखील पक्षाचे वजन कमी झाल्याने राष्ट्रवादीला फटका बसला. हिच परिस्थिती तृणमूल काँग्रेसची आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केवढ्याही उड्या मारल्या तरी तृणमूल हा प्रादेशिक पक्षच राहिला आहे. या पक्षानेही अकारण आपली शक्ती गोव्यात, उत्तर प्रदेश व इतर काही राज्यातील निवडणुकीत खर्च केली. तिथे भोपळा देखील या पक्षाला फोडता आला नाही. राष्ट्रीय दर्जा टिकवून ठेवण्यासाठी किमान चार राज्यात 6 टक्के मते अपेक्षित आहेत तसेच लोकसभेच्या एकूण जागांपैकी 2 टक्के जागा किमान तीन राज्यांतून मिळणे आणि चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा प्राप्त होण्यासाठी तेवढी मतांची टक्केवारी तसेच त्या पक्षाचे आमदार निवडून येणे आवश्यक आहे. एकेकाळी देशातील राजकारणात पं. बंगालमध्ये 20 वर्षाहून अधिककाळ सत्ता गाजविणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाने राष्ट्रीय स्तरावर सरकारे घडविताना व पाडण्यासाठी देखील महत्त्वाची भूमिका बजावली होती. आज बंगालमध्ये भुईसपाट झालेल्या या पक्षाची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. केरळमध्ये कम्युनिस्ट पक्ष आज सत्तेवर आहे. परंतु तिथे एका पक्षाचे सरकार नाही. अनेक डावे पक्ष त्यात सहभागी आहेत. राष्ट्रीयतेचा अनेक वर्षे असलेला दर्जा हा पक्ष गमावून बसला आहे. कारण हा पक्ष नेहमीच नकारात्मक भूमिका घेऊन आलेला पक्ष आहे आणि जनतेपासून तो दूर होत गेला. ज्या भूमित हा पक्ष वाढला, रुजला आणि फोफावला त्या पं. बंगालमध्ये आज तृणमूल काँग्रेस पक्ष पुन्हा एकादा सत्तेवर आहे. कम्युनिस्ट पक्षांना आव्हान देऊन त्यांना संपविण्याचा विडा उचलणाऱ्या ममता बॅनर्जी यांचा झंझावात हा बंगालमध्ये आहे. आपली कीर्ती इतर राज्यातही पसरावी या दृष्टीकोनातून बांधलेले त्यांचे आडाखे साफ फोल ठरले आणि त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी देखील राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमविला. तुम्ही राष्ट्रीय पक्ष नाही, तुम्ही प्रादेशिक पक्षच आहात, असे निवडणूक आयोगाने त्यांना ठणकावून सांगितले. राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा प्राप्त होणे हे नेहमीच फायदेशीर ठरते आणि पक्षाच्या अध्यक्षाला राष्ट्रीय नेत्याचा दर्जा प्राप्त होतो. तसेच ऐन निवडणूक काळात एका राष्ट्रीय पक्षाचे 40 स्टार प्रचारक हे प्रचार कार्यात उपयोगी पडतात व त्यांच्या सभांचा खर्च हा निवडणूक प्रचारात गृहित धरला जात नाही तसेच राजधानी दिल्लीमध्ये या पक्षाला स्वत:चे कार्यालय स्थापन करण्यासाठी अल्पदरात सरकारी बंगला मिळतो. राष्ट्रवादी, कम्युनिस्ट आणि तृणमूल हे तिन्ही राष्ट्रीय पक्ष होते. तिघांवरही प्रादेशिक पक्षाचा दर्जा घेऊन बसावे लागले ही त्या पक्षांची व त्यांच्या नेत्यांची नामुष्की आहे. राजकारणात कोणीही अकारण फुशारक्या मारण्याचा प्रयत्न करू नये. जनता देखील फार हुशार आहे. कोणत्या पक्षाला किती महत्त्व द्यायचे हे जनतेला देखील माहित आहे. आता ‘आप’ या पक्षाचा विचार करता हा पक्ष आज दिल्लीमध्ये 85 टक्के आमदार प्राप्त केलेला पक्ष आहे. पंजाबमध्ये तर काँग्रेसचा सुफडा साफ करून हा पक्ष सत्तेवर पोहोचलेला आहे. गुजरातमध्ये तृतीय स्थानावर, गोव्यामध्ये देखील आज हा पक्ष तृतीय स्थानावर आहे. हिमाचलमध्ये बऱ्यापैकी मते प्राप्त केलेला, परंतु तिथे खातेही उघडू शकला नसला तरी जनतेमध्ये हा पक्ष रुजला. कर्नाटकात निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. तिथेही आप 224 जागा लढवित आहे. आणखी काही महिन्यांनी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड येथेही निवडणुका होणार असून तिथे हा पक्ष निवडणूक लढविल. काँग्रेस नंतर आता ‘आप’ एका मजबूत अवस्थेत पुढे येत आहे. या पक्षाला फार मोठा अनुभव आहे असेही नाही. अरविंद केजरीवाल हे समाजकारणातून राजकारणात आलेले. राष्ट्रीय राजधानी दिल्ली विधानसभेवर गेल्या तीन निवडणुकांमध्ये आपली पकड मजबूत करून ठेवलेल्या या पक्षाने हळूहळू देशातील विविध राज्यांमध्ये आपले पंख पसरविण्यास प्रारंभ केलेला आहे. राजस्थानमध्ये सत्ताधारी काँग्रेसमधील दोन उभे गट पडलेले आहेत. त्यातील सचिन पायलट यांना आपल्या जाळ्यात ओढण्याची नामी संधी ‘आप’चे अरविंद केजरीवाल हे सोडणार नाहीत. ‘आप’ने आपली वाटचाल अत्यंत शिस्तबद्धरित्या केलेली आहे. कोणत्या राज्यात काय केले पाहिजे या दृष्टीकोनातून ‘आप’ने रोडमॅप आखला आहे. पवार यांच्या व त्यांच्या राष्ट्रवादीचा कमी होत गेलेला वरचष्मा आता केवळ महाराष्ट्रापुरताच सिमित राहिलेला आहे. कम्युनिस्ट पक्ष हा केरळ वगळता त्रिपुरामध्ये देखील फारसा सुधारला नाही. तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना अतिआत्मविश्वास नडला. त्यामुळे पं. बंगाल वगळता इतर राज्यांमध्ये त्यांच्या पक्षाला कोणी स्थान देण्यास तयार नाही. राष्ट्रीय दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी पक्षाची तशी राष्ट्रीयस्तरावरची भूमिका आवश्यक असते. राष्ट्रीयता गमावून प्रादेशिकता मिळविण्याची वेळ या पक्षाच्या नेत्यांवर आलेली आहे. हा प्रकार म्हणजे पदावनती आहे.
Previous Articleएमजी मोटर्सची कॉमेटची माहिती सादर
Next Article हर्षल पटेलचे आयपीएलमध्ये बळींचे शतक
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








