मोहम्मद युनुस यांना हटविण्यास लष्कर कटिबद्ध
वृत्तसंस्था / ढाका
बांगला देशची सेना आणि तेथील प्रशासनाचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनुस यांच्यातील मतभेद विकोपाला गेले असून युनुस यांना पदावरुन हटविण्याचा निर्धार तेथील सेनानेतृत्वाने केला आहे, असे दिसून येत आहे. त्यांना पदच्युत करण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार तेथील सेनानेतृत्व करीत आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.
तेथील सेना प्रमुखांनी आता प्रशासनातही लक्ष घालण्यास प्रारंभ केला आहे. प्रशासनाच्या महत्वाच्या बैठकांना सेनाधिकाऱ्यांनी उपस्थिती असते. तीन दिवसांपूर्वी युनुस यांनी सेना नेतृत्वाशी जुळवून घेत, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यास मान्यता दिलेली आहे. तथापि, तेव्हढ्याने सेनाप्रमुखांचे समाधान झालेले नसून त्यांना युनुस यांना पदच्युत करायचेच आहे, अशी माहिती मिळत आहे.
तर सेनेच्या ताब्यात देश
बांगला देशचे सेना प्रमुख वाकर उझ झमान यांनी देशाची सत्ता सेनेच्या हाती सोपवावी, अशी मागणी मोहम्मद युनुस यांच्याकडे केली आहे. मात्र, युनुस यांनी ही मागणी अमान्य केल्यास झमान हे स्वत: एका सौम्य बंडाद्वारे देशाचे प्रशासन आपल्या हाती घेतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. बांगला देशच्या घटनेनुसार आधीचे सरकार कोसळल्यास 90 दिवसांमध्ये सार्वत्रिक निवडणूक घ्यावी लागते. पण युनुस यांची याला मान्यता नाही. त्यामुळे त्यांना पदावरुन हटविण्याचे प्रयत्न केले जात आहेत, अशी स्थिती या देशात उद्भवली आहे.
दोन्ही पक्षांच्या एकीचे प्रयत्न
बांगला देशात सध्या पदच्युत नेत्या शेख हसीना आणि विरोधी नेत्या खलिदा झिया यांचे पक्ष प्रमुख आहेत. या दोन्ही पक्षांमध्ये एकी करण्याचा प्रयत्नही झमान यांच्याकडून होत आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. या दोन पक्षांनी एकत्र निवडणूक लढवावी. सेना त्यांना साहाय्य करेल, असे वातावरण सध्या दिसून येते.
पुढचा आठवडा महत्वाचा
बांगला देशमध्ये नेमके काय घडणार हे येत्या एक-दोन आठवड्यांमध्ये स्पष्ट होण्याची शक्यता आहे. जे घडेल त्यावर या देशाचे भवितव्य अवलंबून आहे. सध्या या देशात महागाईने थैमान घातले असून आर्थिक विकास ठप्प झाला आहे. त्यामुळे जनतेत मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वातील अंतरिम प्रशासनाविषयी संताप आहे. एकंदर, या देशात राजकीय अस्थैर्य असून त्यामुळे सेनाप्रमुख झमान यांची भूमिका महत्वाची ठरेल, अशी शक्यता तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.









