मुस्लीम लीग कर्नाटक स्टेट युनिट बेळगावचे अध्यक्ष दस्तगीर आगा यांची माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
राज्यात जनता महागाईने होरपळून गेली असतानादेखील त्याकडे दुर्लक्ष करून भाजप सरकार समाजात अराजकता माजवत आहे. बापट गल्लीत शाही मशिदीच्या ठिकाणी साई मंदिर होते, असे वक्तव्य एका आमदाराने केले आहे. हे केवळ राजकीय षड्यंत्र आहे. याला कोणीही बळी पडू नये. शिवाय याबाबत लवकरच जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले जाणार आहे, अशी माहिती इंडियन युनियन मुस्लीम लीग कर्नाटक स्टेट युनिट बेळगावचे अध्यक्ष दस्तगीर आगा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
भाजप सरकार महागाई कमी करण्याबरोबरच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे मंदिर आणि मशिदींना लक्ष्य करून समाजातील शांतता भंग केली जात आहे. अशा खोटय़ा भूलथापांना जनतेने बळी पडू नये. शहरात हिंदू-मुस्लीम गुण्यागोविंदाने नांदत आहेत. मात्र केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हिंदुत्वाच्या नावाखाली मुस्लीम आणि इतर अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात आहे. मुस्लिमांच्या प्रार्थनास्थळांना टार्गेट केले जात आहे. 100 वर्षांहून अधिक जुन्या शाही मशिदीच्या ठिकाणी मंदिर होते, असा खोटा दावा आमदारांनी केला आहे. याविरोधात मुस्लीम बांधव संघटितपणे लढा देणार आहेत, असे ते म्हणाले.









