काही लाख कोटी रूपये गुंतवणुकीचा बारसू तालुका राजापूर येथील प्रस्तावित पेट्रोलियम कॉम्प्लेक्स प्रकल्पाच्या विरोधात काही लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केल़े त्या पाठोपाठ राजकीय नेत्यांनी त्यात उडी घेऊन राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केल़ा देशाला पेट्रोलियम प्रकल्पाची गरज आहे का आणि तो राजापूर तालुक्यात उभारणे हिताचे आहे का, हा प्रश्न राजकीय वादंगामध्ये मागे पडला आह़े विविध राजकीय पक्ष प्रकल्पाच्या सोबत राजकारण पुढे नेण्याचा प्रयत्न करत असल्याचे कोकणी माणूस पाहत आह़े
शनिवारी शिवसेना पक्ष प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रस्तवित परिसरात भेट दिल़ी अनेकांशी त्यांनी बोलणे केल़े त्यानंतर माध्यमांशी देखील ते बोलल़े ते म्हणाले बल्क ड्रग पार्क, वेदांता फॉक्सकॉन यांच्यासारखे प्रकल्प गुजरातला जात आहेत व विनाशकारी रिफायनरी प्रकल्प कोकणाच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत आहे.. म्हणजे गुजरातला रांगोळी आणि कोकणाला राख.. हे कदापी खपवून घेतले जाणार नाही.. जर सरकार राज्यभरातील पोलीस आणून हुकूमशाहीने रिफायनरी प्रकल्प कोकणावर लादण्याचा प्रयत्न करत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता बारसूत उतरवू..

यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले की, नाणारचा प्रकल्प रद्द झाल्यानंतर सत्ता बदल झाला व आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात दिल्लीहून व आताचे गद्दार, सुपारीबहाद्दर यांनी हा प्रकल्प चांगला आहे. बारसू परिसरात निमर्नुष्य जागा आहे. तेथील लोकांची प्रकल्पाला संमती आहे, अशी माहिती दिली. तसेच ग्रामपंचायतीचे समर्थनाचे ठरावही दाखवले. त्यामुळे आपण रिफायनरीसाठी पत्र दिल्याची कबुली ठाकरे यांनी दिली. आज जसं मी तुमच्याशी येवून बोलतोय तसेच मुख्यमंत्री असतो तरी येवून तुमच प्रकल्पाबाबत मत घेतलं असतं तर चांगलं झाले असते असे ठाकरे म्हणाल़े
कोकणातला रिफायनरी प्रकल्प गुजरातला न्या व गुजरातला नेलेले आमचे चांगले प्रकल्प आम्हाला द्या, अशी मागणी ठाकरे यांनी केली. दुसरीकडे शनिवारीच माजी खासदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली राजापूरात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात रिफायनरीच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. प्रांताधिकारी, तहसीलदारांना यावेळी समर्थनाचे निवेदन दिले. समर्थकांमधून बारसू नको तर आम्हांला नाणार द्या, अशी भूमिका घेण्यात आली.
कॉर्नर सभेत आमदार नेतेश राणे यांनी उध्दव ठाकरेंना पंतप्रधानांची ‘मन की बात’ समजत नाही मात्र त्यांना ‘धन की बात’ समजते. मुख्यमंत्री असताना रिफायनरीला समर्थन तर विरोधात बसल्यावर लगेच परिवर्तन तसेच रिफायनरीमुळे स्थानिक तरूणांना रोजगार, व्यवसाय, उद्योग, आरोग्य, शिक्षण असा अपेक्षित विकास मिळणार असल्याचे सांगितले.
शनिवारी रत्नागिरीत मनसेचे सर्वोच्च नेते राज ठाकरे यांची सभा झाल़ी सभेत ते म्हणाले पण आज कोकणात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत़ त्याला जबाबदार कोकणवासियांनो तुम्ही आहात. त्याच-त्याच व्यापारी, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांना निवडून देत असल्याने त्यांनी कोकणाचा व्यापार करून ठेवला आह़े इतिहास भूगोलाशिवाय नाही. प्रत्येकाने जमीन ताब्यात घेतल्यात़ तुम्ही जमीन विक्रीसाठी काढता आहात आणि परप्रांतियांना विकता आहात़ पण प्रकल्प कोणता येतोय, याची माहिती नसताना हे व्यवहार करत आहेत़ त्यासाठी सावध रहा, कोकण वाचवा, अशी साद मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घातल़ी
कडकडाट झाल़ा सुरूवातीलाच राज ठाकरे यांनी टोला लगावताना बरेच विषय तुंबलेत, पावसाळा तोंडावर आल्याने नालेसफाई होणे गरजेचे असल्याचे सांगितल़े हल्ली कोण कुठे आहे, समजत नाही. आमदार समोर येतो तेव्हा विचारावेसे वाटते. प्रस्तावित रिफायनरीच्या मुद्यावरून बोलताना ते म्हणाले, आपण येथील जागेसाठी भांडतोय. हा प्रकल्प नाणार की बारसूला होणार, याविषयी प्रश्न होता. पण हे बारसू आले कोठून, आज येथील लोकांच्या पायाखालची जमीन निसटून जाते. त्याचा थांगपत्ता तुम्हांला लागत नाह़ी लोकप्रतिनिधी कवडीमोल दामाने जमिनी विकत घेत आहेत़ तेदेखील कळत नाह़ी याच लोकप्रतिनिधींचे व्यापारी मित्र त्याच जागांच्या व्यवहारासाठी फिरत असतात. जमिनी विकत घेतात. या लोकांचे साटेलोटे झालेले असते. अगोदरच जमिनी घ्यायला ते सुरूवात करतात. त्यासाठी कोकणवासियांनी जागे रहा, नाहीतर पश्चाताप होईल. उद्या कोकणात दुसरी भाषा येईल, कारण आपण बेसावध असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितल़े
कोकणात रिफायनरीच्या मुद्यावरून राजकीय धुळवड उठलेली असताना दुसऱ्या बाजूला प्रशासनाकडून माती परीक्षणाचे काम सुनियोजितपणे पुढे जात आह़े त्यासाठी पोलीस संरक्षण दिले जात आह़े विशिष्ट अंतराच्या आत पोलीस नागरिकांना सोडत नाहीत़ त्यामुळे आंदोलनाने प्रस्तावित परीक्षण काम बाधित झालेले नाह़ी एका बाजूला कितीही आंदोलने झाले तरी दुसऱ्या बाजूला ठरवलेले उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्वास प्रशासकीय अधिकारी व्यक्त करत आहेत़
जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तज्ञ अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांची एक बैठक राजापुरात झाली त्यानंतर प्रकल्प क्षेत्रातील प्रत्येक गावात रिफायनरीची माहिती सांगण्यासाठी पथक पाठवावे, असा प्रस्ताव ठेवण्यात आल़ा याप्रमाणे प्रत्येक गावात शासकीय पथकाने माहिती देण्याचा प्रयत्न केल़ा परंतु अनेक गावात नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नाही, काही ठिकाणी स्थानिक रहिवाशांनी चक्क बहिष्कार टाकला, यामुळे गावोगाव जाऊन रिफायनरीची माहिती सांगण्याचा उद्देश कितपत सफल झाला, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आह़े प्रशासनाने काम हाती घेण्यापूर्वी प्रस्तावित रिफायनरीच्या विषयी सगळी माहिती आम्ही लोकांना देऊ इच्छितो, असे सांगून ती माहिती देण्याची व्यवस्था खुल्या मनाने करण्याची गरज होत़ी अद्यापही जनप्रबोधनाचा व्यापक मुद्दा महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने मनावर घेतलेला नाह़ी तो घेतल्यास तणावाचे वातावरण आजपेक्षा निश्चितच कमी होईल़ पोलीस बळावर प्रकल्प रेटून नेण्याचा सरकारी विचार खरेतर कोणत्याच काळात योग्य नाह़ी यापूर्वी 2000 च्या दशकात गुहागर तालुक्यातील एनरॉन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रचंड पोलीस दल कोकणी लोकांनी अनुभवले आह़े राजापूर तालुक्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी देखील प्रचंड पोलीसबळाचा वापर सरकारी यंत्रणेने केला होत़ा आता रिफायनरीच्या नाणार टप्प्यावर पाठोपाठ बारसु टप्प्यावर देखील जनप्रबोधनापेक्षा ताकदीचा वापर करण्याबाबत सरकारी व्यवस्थेला मोठी उत्सुकता आह़े राज्यात शरद पवार हे मुख्यमंत्री असताना एनरॉन प्रकल्पावेळी पोलीस बळाचा वापर झाल़ा आताही तो होत आह़े त्यामुळे नेतृत्व कुणाकडे यापेक्षा बळाचा वापर करण्याची भूमिका कधी दूर होणार हा प्रश्न आह़े
सुकांत चक्रदेव








