काँग्रेसचे सहा बंडखोर अपक्ष आमदारांसह उत्तराखंडमध्ये
वृत्तसंस्था/ ऋषिकेश, नवी दिल्ली
हिमाचल प्रदेशातील राजकारणातील चढाओढ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करून हिमाचल प्रदेशात काँग्रेसला धक्का देणाऱ्या सहा काँग्रेस आमदारांसह ऋषिकेशला पोहोचलेल्या तीन अपक्ष आणि दोन भाजप आमदारांनी दुसरा दिवसही ऋषिकेशजवळील हॉटेल ताजमध्ये घालवला.
राज्यातील तीन अपक्ष आमदारांसह काँग्रेसच्या सहा अपात्र आमदारांना चंदीगडहून ऋषिकेशला हलवण्यात आले आहे. चंदीगडहून हे सर्व नेते, आमदार आणि बंडखोर नेते जॉली ग्रँट विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांना ऋषिकेशला नेण्यात आले. हे सर्व नेते ऋषिकेशमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले आहेत. माजी उद्योगमंत्री विक्रम सिंह ठाकूर आणि आमदार राकेश जामवाल हेदेखील त्यांच्यासोबत असल्याचे समजते.
चंदीगडहून ऋषिकेशला पोहोचलेल्या आणि विधानसभेतून अपात्र ठरलेल्या आमदारांमध्ये राजिंदर राणा, सुधीर शर्मा, इंदर दत्त लखनपाल, रवी ठाकूर, देवेंद्र कुमार भुट्टो आणि चैतन्य शर्मा यांचा समावेश आहे. याशिवाय अपक्ष आमदार कृष्णलाल ठाकूर, होशियार सिंह आणि आशिष शर्मा हेही त्यांच्यासोबत आहेत.
काँग्रेसच्या या सहाही आमदारांना पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन केल्याप्रकरणी अपात्र ठरवण्यात आले असून, त्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घ्यायचा आहे. सध्या राज्यातील एकाही नेत्याने किंवा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने येथे राहणाऱ्या आमदारांची भेट घेतली नाही. हिमाचल प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी भाजप उमेदवाराच्या बाजूने क्रॉस व्होटिंग केले होते. क्रॉस व्होट करणाऱ्या काँग्रेसच्या सहा आमदारांना विधानसभा अध्यक्ष कुलदीपसिंग पठानिया यांनी अपात्र ठरवले आहे. ज्यावर काँग्रेसच्या आमदारांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सोमवारी सर्वोच्च न्यायालय आपला निकाल देण्याची शक्मयता आहे.









