पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन देशवासियांना उद्देशून केलेल्या 94 मिनिटांच्या भाषणात अनेक मुद्दे उपस्थित करुन सरतेशेवटी 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर मी पुन्हा येईन आणि याच ठिकाणाहून पुढीलवर्षी देखील ध्वजारोहण करीन असे जाहीर केले. 2014 मध्ये प्रथमच स्वबळावर केंद्रात सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्यावरुन नेमके काय बोलणार, याबाबत जनतेमध्ये कमालीची उत्सुकता होती नव्याची नवलाई होती. 9 वर्षानंतर आता हळूहळू ही नवलाई संपुष्टात येत आहे. पंतप्रधान नेमके काय बोलणार! याबाबत कदाचित काही घटकांमध्ये उत्सुकता असावी. परंतु 4 दिवसांपूर्वी लोकसभेत सव्वादोन तास केलेल्या भाषणातून विरोधकांची यथेच्छ धुलाई करताना काही ऐतिहासिक पुरावे दिले होते. त्यातील काही पुरावे हे खोटे कसे आहेत? याची माहिती गोळा करण्यातच काही विरोधी पक्षांच्या नेत्यांची शक्ती खर्ची पडली. पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावरील भाषण हे ऐकण्यासाठी देशातील नामवंतांबरोबरच विदेशातील अनेक नेते व अधिकारी येत असतात. त्यांच्यासाठी बसण्याची आसनव्यवस्था देखील केलेली असते. 1947 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांनी या ठिकाणाहून केलेल्या पहिल्या भाषणानंतर ही प्रथा व परंपरा चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इ.स. 2014 पासून या लाल किल्ल्यावरुन सलगपणे भाषणे देण्याची प्रथा पुढे नेली. गैर काँग्रेसी नेत्याला दीर्घकाळ सलग 10 वर्षे भाषणे करण्याचा मान मिळविणारे नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. मात्र पंतप्रधानांच्या परवाच्या भाषणाची गाडी देशाच्या एकंदर विकासाच्या आढाव्याच्या एका सरळ मार्गाने जात असता हळूहळू ती ट्रॅकवरुन दुसऱ्या मार्गावर गेली. हा मार्ग म्हणजे पुढील 6 महिन्यानंतर होणार असलेल्या लोकसभा निवडणुका. लाल किल्ल्यावरील परवाचे ते भाषण म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला की काय, असा भास निर्माण झाला. प्रथमच त्यांनी मेरे देशवासियों! ऐवजी मेरे प्यारे परिजनो! हा शब्द वापरलेला दिसला. 140 कोटी देशवासियांबाबत त्यांना चिंता आहे व त्या अनुषंगाने त्यांनी अनेक योजना आखल्या व मांडल्या आणि कित्येक गोष्टींचा उलगडाही केला. त्यांचे भाषण हे प्रगतीच्या मार्गावर असताना पुढील वर्षी देखील आपणच येणार व इथे ध्वजारोहण करणार असे सांगताना भ्रष्टाचार, परिवारवाद म्हणजेच घराणेशाही आणि तुष्टीकरण म्हणजेच अल्पसंख्यकांचे लांगुलचालन या विषयांवर प्रकाशझोत टाकला आणि केवळ नाव घेणेच शिल्लक राहिले. काँग्रेस व विरोधी पक्षांवर खरपूस टीका केली. लाल किल्ल्यावरील प्रत्येक पंतप्रधानाचे भाषण हे ऐतिहासिक स्वरुपाचे असते. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पंतप्रधांच्या भाषणाला राजकीय वास येऊ लागला. लाल किल्ल्यावरील भाषण हे राजकारण विरहित असावे अशी अपेक्षा असते. लाल किल्ल्यावरील भाषण म्हणजे ते राजकीय व्यासपीठ ठरु नये, अशीच अपेक्षा असते. मात्र प्रथमच त्याला छेद देण्यात आला. या देशाचे परिवारवाद अर्थात घराणेशाहीमुळे फार नुकसान झाले हे वाक्य आतापर्यंत कितींदा उच्चारावे! त्याला काही मर्यादा आहे की नाही. घराणेशाहीच्या नावाने सत्ताधारी भाजपने एवढी वर्षे काँग्रेसला नावं ठेवली आणि भाजपमध्ये काय चाललेय! दिल्लीपासून गोव्यापर्यंत असो वा कर्नाटकपर्यंत सर्व ठिकाणी भाजप नेत्यांची जी नवी पिढी तयार होतेय त्या पिढीला पक्षाने आपल्या राजकीय प्रवाहात सामील करुन घेतलेलेच आहे. मात्र आता परिवारवादावर बोलण्यासारखे काय शिल्लक राहिलेय! भाजपमध्ये हिमाचल प्रदेशपासून कर्नाटकपर्यंत सर्वत्र परिवारवाद रुजलेला आहे. परिवारवादापासून जर सुटका करुन घ्यावयाची असेल तर महाराष्ट्रात कुटुंबाच्या कुटुंबे जे पक्षामध्ये धुडघूस घालित आहेत त्यांना बाहेर काढणार का? यावर कोण उत्तर देणार! त्यामुळेच पंतप्रधानांच्या लाल किल्ल्यावरील भाषणात जे तीन महित्वाचे मुद्दे त्यांनी 140 कोटी देशवासियांसमोर मांडले, त्यातील तिन्ही मुद्दे आजकाल भाजपलादेखील चिकटून बसलेले आहेत व त्यातून भाजपची देखील सुटका झालेली नाही. भ्रष्टाचार हा त्यातील पहिला मुद्दा होता. 2014 असो वा 2015, 2016 भले 2018 नंतर जरी भ्रष्टाचाराचा मुद्दा सत्ताधारी भाजपने घेतला, त्याला कोणी आक्षेप घेऊ शकत नव्हते. अनेक वर्षे झालेल्या भ्रष्टाचारात उघडे पाडण्यात व कारवाई करण्यात सत्ताधारी पक्षाला वेळ द्यावा लागला. परंतु आता गेली 9 वर्षे भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्तेवर आहे. पंतप्रधानांनी अनेक उपाययोजना काढल्या तरी देखील देशातून भ्रष्टाचाराचे निर्मूलन झाले का? तर भ्रष्टाचार अद्याप संपुष्टात आलेला नाही हे आता पंतप्रधानांना देखील मान्य करावे लागत आहे, हे दुर्देव नाही का? देशातील अनेक राज्यामंध्ये भ्रष्टाचार राजरोसपणे चालू आहे. केवळ विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यातच नव्हे, तर भाजपची सरकारे असलेल्या राज्यांमध्ये देखील भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला आहे. कर्नाटकात भाजपला आपला मुख्यमंत्री बदलण्याची वेळ का आली? आणि कर्नाटकात भाजपचे सरकार का गेले? याचे मूळ शोधता तिथे भ्रष्टाचाराचे झरे सापडतील. त्यामुळे भ्रष्टाचार ही कोणा एका राजकीय पक्षाची मक्तेदारी नाही राहिली. ते तर सर्व पक्षांचे ब्रीद झालेले आहे. मोदींच्या भाषणातील तिसरा मुद्दा होता तो तुष्टीकरण. अल्पसंख्यकांचे लांगुलचालन काँग्रेसने केले, हे अलीकडेच संसदेत देखील त्यांनी म्हटलेले होते. आता काँग्रेस पक्ष सत्तेवर नाही. तेव्हा हे मुद्दे गौण ठरतात. लाल किल्ल्यावरील ऐतिहासिक भाषणाची राजकीय घसरण होऊ नये, असे देशातील अनेक बुध्दीवाद्यांना वाटते. देशवासियांना संबोधित करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी ते एक पवित्र व्यासपीठ असल्याने त्याला राजकारणाची फोडणी आवश्यक होती का! पंतप्रधानांच्या लाल किल्ल्यावरील भाषणाने आतापासूनच प्रकारचे तापमान तर वाढले नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 8 वर्षापूर्वीचे भाषण आणि आजचे भाषण यात फार मोठा फरक आहे. त्यावेळी नुकतीच सत्ता हाती घेतलेली, अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले होते. आज नव्याने येणारी निवडणूक ही सत्ताधारी पक्षासमोर आव्हान तर बनली नाही ना! लाल किल्ल्यावरील भाषणाला आलेला दर्प वेगळे काय दर्शवितो?