केरळ उच्च न्यायालयाचा देवस्वोम बोर्डाला निर्देश
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळ उच्च न्यायालयाने राज्यातील तीन प्रमुख देवस्वोम बोर्डांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. बोर्डाच्या अंतर्गत येणाऱ्या मंदिरांमध्ये कुठल्याही प्रकारच्या राजकीय घडामोडी घड नयेत असे न्यायालयाने म्हटले आहे. एर्नाकुलम येथील रहिवासी एन. प्रकाश यांच्या याचिकेवर सुनावणी करत न्यायाधीश राजा विजयराघवन आणि के.व्ही. जयकुमार यांच्या खंडपीठाने त्रावणकोर, कोचीन आणि मालाबार देवस्वोम बोर्डाला निर्देश जारी केले.
कोझिकोडमधील ताली मंदिर, अटिंगलमधील श्री इंदिलयप्पन मंदिर आणि कोल्लममधील कडक्कल मंदिर यासारख्या मंदिर परिसरांचा वापर राजकीय घडामोडींना प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आला होता. अशा हालचाली अनुचित असून भाविकांच्या भावनांना ठेच पोहोचविणाऱ्या असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. बोर्डाकडून मंदिराची पारंपरिक पूजा, विधी आणि प्रथापरंपरांशी निगडित आयोजनाशिवाय कुठल्याही प्रकारचे आयोजन किंवा कार्याच्या निवडीला विनियिमत करण्यासाठी निर्देश जारी करणे व्यवहार्य नाही. धार्मिक संस्था (दुरुपयोग निवारण) अधिनियम 1988 च्या तरतुदींचे उल्लंघन करत मंदिर परिसराचा दुरुपयोग केल्यास कारवाई करण्यात यावी असे खंडपीठाने म्हटले आहे.








