कवठेमहांकाळ :
कवठेमहांकाळ पोलीस आणि कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या वतीने कवठेमहांकाळ शहरात प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे शहर आता २४ तास सीसीटीव्हीच्या कक्षेत येणार आहे. या सीसीटीव्हीमुळे शहरात घडणाऱ्या गुन्हेगारीला आळा बसेल. शहरामध्ये सीसीटीव्ही बसवण्याची संकल्पना पोलीस निरीक्षक जोतिराम पाटील, कवठेमहांकाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी राबवली.
कवठेमहांकाळ शहरात सध्या सीसीटीव्ही बसवण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. तालुक्यातून गुन्हेगारी करून शहरामध्ये अनेक गुन्हेगार ये जा करत असतात आता या सीसीटीव्हीमुळे हे आरोपी ओळखणे सोपे होणार आहे. शिवाय कवठेमहांकाळ शहरातील वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालणे हे पोलिसांचे कर्तव्य असून शहरात कुठेही दंगा झाला तर ही घटना थेट पोलीस स्टेशनमध्ये दिसून येईल आणि पोलिसांना तात्काळ घटनास्थळी पाठवणे सुलभ होईल, असे स्पष्टीकरणही पोलीस निरीक्षक जोतिराम पाटील यांनी केले. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधिक्षीका रितू खोकर, गृहपोलीस उपाधीक्षक चुडाप्पा, उपाधीक्षक सुनिल साळुंखे तसेच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार, नगरपंचायतीचे प्रशासन यांनी सीसीटीव्ही बसवण्यामध्ये मोलाची कामगिरी केली. सुमारे २० लाख रुपये किंमतीचे सीसीटीव्ही बसवण्यात येत आहेत. सध्या चौका चौकात सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरु आहे. ३२ ठिकाणी बसवण्यात येणाऱ्या सीसीटीव्हीचे कंटोल पोलीस स्टेशनमध्ये असेल. कवठेमहांकाळ शहरातील मुलामुलींच्या शाळा, महाविद्यालये, जुने एस टी स्टॅन्ड, नवे एस टी स्टॅन्ड, विस्तारित होत चाललेला विद्यानगरचा भाग, थबडे वाडी चौक, बाजारपेठ, भाजी मंडई, देशिंग कॉर्नर, हिंगणगाव कॉर्नर, म्हसोबा गेट, शिवाजी चौक, काळे प्लॉट यासह प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही चा २४ तास पाहरा राहील, असेही पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील यांनी सांगितले.
मध्यंतरी एक खूनप्रकरण व मारामारीमध्ये कवठे महांकाळ शहरातील सीसीटीव्ही फुटेज चौकशीकामी आम्हाला उपयोगी पडले त्यामुळेच शहरामध्ये सीसी टीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आणि ही संकल्पना येत्या २ दिवसात पूर्ण होईल, असेही पोलीस निरीक्षक पाटील म्हणाले.








