रात्रीची गस्त आता पोलिसांच्या वरकमाईचे साधन बनत आहे?
कोल्हापूर : रात्रीच्या वेळी उनाडकी करणाऱ्या तरुणांच्या टोळक्याला दुचाकीवरुन आलेल्या दोन खाकीतील रक्षकांनी व्हिनस कॉर्नर चौकात सोमवारी (दि.9) रात्री पावणेबारा वाजता हटकले. दोघांना शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेले. एका तरुणाला परदेशात नोकरीची संधी असल्याची माहिती चौकशीतून समजताच त्यांच्या पाकिटात असलेली रक्कम घेऊनच क्लिन चिट दिले.
गस्तीच्या नावाखाली आणलेल्या संशयितांना तोडपाणी करुन सोडून देण्याचा प्रकार नित्याचा असल्याची चर्चा आहे. ही तर वाटमारीच असून यंत्रणेच इतकं धाडस वाढले असेल तर त्याला पायबंद घालणार कोण? हा प्रश्न आहे.
रात्रीच्यावेळी उनाडपणा करत फिरणाऱ्यांना गस्तीच्या पोलिसांनी हटकले पाहिजे. मात्र ही रात्रीची गस्त आता पोलिसांच्या वरकमाईचे साधन बनत आहे. सोमवारी व्हिनस कॉर्नर येथून बावणे बाराच्या सुमारास दोन तरुणांना शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गस्त पथकाने हटकले. ही पोरे वारांगणाभोवती घिरट्या घालत होती. या पोरांसह अनेक तरुणांचं टोळकं तिथे होते. इतक्यात तिथ फिरतीची गाडी येताच यातील सात आठ पोरांनी धूम ठोकली. दोघांची गाडीच सुरू न झाल्याने पथकाच्या हाती लागले. मग या दोघांना रितसर पोलीस ठाण्यात नेले.
गस्तीच्या पोलिसांनी या दोघांची सर्व माहिती जाणून घेतली. भेदरलेल्या पोराने परदेशात नोकरीची संधी आल्याचेही सांगितले. आजच्या घटनेमुळे त्याची नोकरी कशी अडचणीत येऊ शकते हे पोलिसी भाषेत सांगितले. चौकशी सुरू असतानाच आलेल्या एका पोलिसाने पहिल्यांदा एका तरुणाला जुन्या दगडी इमारतीमध्ये नेले.
त्याच्या पाकिटात असलेली सर्व रक्कम घेतली. अन् चौकशी पूर्ण केली. त्यानंतर दुसऱ्या तरुणाचीही अशीच एक गांधीबाबा घेऊन चौकशी संपवली. पैसे मिळेपर्यंत त्या तरुणांना यंत्रणेनं जागेवरुन हालूनही दिले नव्हते. मात्र खिसा गरम होताच तरुणांना एका मिनिटात हाकलून लावले.
तोडपाण्याचा हा सर्व प्रकार पत्रकारासमोर घडला. संबंधित पत्रकाराने ठाणे अंमलदाराला सांगितले. त्या दोघा कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. दरम्यान ती भेदरलेली दोन मुले रेल्वेस्थानकापर्यंत गेली होती. त्यांना मोबाईल कॉल करुन बोलावून घेतले. तो चौकशी करणारा कर्मचारी बोलावयला म्हणून गेला तो तिकडेच पसार झाला.
अर्धातास ठाण्याकडे फिरकलाच नाही. परदेशात नोकरीला असणाऱ्या मुलांकडून रजिस्टरला नाव घालत नाही असे सांगून पाकिट रिकामे केले होते. मात्र, तरीही त्याचे नाव रजिस्टरला नोंदवले होते. हा प्रकार उघडकीस आलाच तर रितसर रजिस्टरला नोंद करुन ताकीद देऊन सोडले आहे, असा युक्तिवादही करणे यामुळे सोपे होणार आहे.
जास्त गर्दी, जास्त वरकमाई
रेडलाईट एरिया पोलिसांना नवा नाही. पावडर–लाली लावून उभारलेल्या वारांगणा आणि त्याभोवती घिरट्या घालणारी वाहने हे खासकरुन स्टेशन रोडवरील कायमचे चित्र आहे. शनिवार, रविवार आणि सोमवारी हे आठवडी पगाराचे दिवस असल्याने यादिवशी थोडी जादाची गर्दी असते. यामुळे पोलिसांची वरकमाई मोठी होते अशी येथे चर्चा आहे.








