उद्यमबाग पोलीस स्थानकातील घटनेने खळबळ
बेळगाव : उद्यमबाग पोलीस स्थानकातील एका पोलिसाने पोलीस स्थानकात आत्महत्येचा प्रयत्न केला. बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेने एकच खळबळ माजली आहे. मुदकप्पा (वय 26) असे त्या पोलिसाचे नाव आहे. बुधवार दि. 1 जानेवारी रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मुदकप्पाने पोलीस स्थानकात आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक व मुदकप्पा यांच्यात झालेल्या वादावादीनंतर हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी मुदकप्पाला तातडीने राजारामनगर येथील खासगी इस्पितळात हलविले. या संबंधी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्याशी संपर्क साधला असता मुदकप्पाला चक्कर येवून पडल्यामुळे पोलीस स्थानकात गोंधळ माजल्याचे त्यांनी सांगितले. उपचाराअंती मुदकप्पाला घरी जाऊ देण्यात आले आहे.
एक महिन्यापूर्वी आणखी एक घटना
एक महिन्यापूर्वी पोलीस निरीक्षक टी. के. पाटील यांच्या नावे चिठ्ठी लिहून ठेवून याच उद्यमबाग पोलीस स्थानकातील एका पोलिसाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ माजली होती. या प्रकाराबद्दल अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक आर. हितेंद्र यांनीही पोलीस अधिकाऱ्यांना खडसावले होते. हे प्रकरण ताजे असतानाच बुधवारी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पुन्हा आत्महत्येचा प्रयत्नाचा प्रसंग घडला आहे.









