चकमकीत झाला होता मृत्यू : सीबीआय न्यायालयाचा आदेश
वृत्तसंस्था/ जोधपूर
राजस्थानातील बहुचर्चित गँगस्टर आनंदपाल सिंहच्या एन्काउंटरप्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. याप्रकरणी जोधपूर न्यायालयाने सीबीआयचा अंतिम अहवाल फेटाळला आहे. सीबीआय न्यायालयाने या एन्काउंटरमध्ये सामील 5 पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात आदेश दिला आहे. न्यायालयाने संबंधित पोलिसांच्या विरोधात कलम 302 अंतर्गत खटला चालविण्याचा आणि चौकशीचा आदेश दिला आहे.
24 जून 2017 रोजी आनंदपालचा एका एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला होता. या एन्काउंटरला बनावट ठरवत त्याच्या कुटुंबीयांकडून तक्रार करण्यात आली होती. आनंदपालच्या कुटुंबीयांनी या एन्काउंटरला न्यायालयात आव्हान दिले होते. तर सीबीआयने याप्रकरणी अंतिम अहवाल न्यायालयात सादर केला होता. आनंदपालच्या शरीरावर जखमांच्या खुणा होत्या, तसेच ती बनावट चकमक असल्याचे पुरावे असल्याचा दावा आनंदपालच्या पत्नीच्या वतीने करण्यात आला होता. यानंतर न्यायालयाने एन्काउंटरमध्ये सामील तत्कालीन चुरु पोलीस अधीक्षक राहुल बारहट, तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक विद्या प्रकाश चौधरी, पोलीस उपअधीक्षक सूर्यवीर सिंह राठौड, हेड कॉन्स्टेबल कैलास विरोधात खटला चालविण्याचा आदेश दिला आहे.
आनंदपालच्या अटकेतील साथीदारांनीच तो सालासर येथे लपून बसल्याची माहिती चौकशीदरम्यान दिली होती. या माहितीची पुष्टी होताच पोलिसांच्या विशेष पथकाने आनंदपालला अटक करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांचे पथक संबंधित ठिकाणी पोहोचताच आनंदपालने घराच्या छतावरून गोळीबार सुरू केला होता. याच्या प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आनंदपाल मारला गेला होता. त्याला 6 गोळ्या लागल्या होत्या. आनंदपाल विरोधी पोलिसांच्या मोहिमेकरता सुमारे 8-9 कोटी रुपये खर्च झाले होते.









