रामा काणकोणकर हल्ला प्रकरण : जेनिटोसह आरोपींच्या कोठडीत वाढ
पणजी : रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात पणजी प्रथमवर्ग न्यायालयाने काल बुधवारी जेनिटो कार्दोझसह आठही संशयितांच्या पोलिस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ केली आहे. याप्रकरणी पणजी पोलिसांनी सात दिवसांची कोठडी वाढवून मागितली असता ती नाकारण्यात आली. आरोपींनी वापरलेला मोबाईल फोन मांडवीत फेकल्याने पोलिस अजून त्याच्या शोधात आहेत, असे न्यायालयास सांगण्यात आले.
या सुनावणीदरम्यान, जेनिटोच्या वकिलांनी कोठडी वाढवण्यास जोरदार आक्षेप घेतला. केवळ गुह्यात वापरलेले वाहन आणि मोबाईल फोन हस्तगत करण्यासाठी पोलिसांना आणखी कोठडी नको, असा युक्तिवाद त्यांनी केला. तसेच, अटक करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन झाले नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अटकेची योग्य कारणे देण्यात आली नाही आणि फक्त जेनिटोच्या नातेवाईकांनाच अटकेची माहिती दिली होती, असा दावाही वकिलांनी केला.
पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपीला एकदा कोठडीत पाठवल्यानंतर पुढील तपास सुरू ठेवण्यासाठी कोठडी वाढवणे आवश्यक आहे. गुह्यात वापरलेले वाहन अद्याप जप्त करण्यात आलेले नाही. तसेच, पीडित आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवणे बाकी आहे. आरोपीने व्हॉट्सअप कॉल केला होता आणि त्यानंतर आपला मोबाईल मांडवी नदीत फेकून दिला, जो अद्याप सापडला नाही, असेही पोलिसांनी नमूद केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने संशयितांची पोलिस कोठडी दोन दिवसांनी वाढवली आहे.
“सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणाची पोलिस खात्याने कसून चौकशी सुरू केली आहे. या तपासात निश्चितपणे मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. काणकोणकर यांना पोलिस संरक्षण देण्यात येईल.”
– आलोक कुमार (पोलिस महासंचालक)
प्रकरण अद्याप वलयांकितच! संशयितांच्या कोठडीत वाढ; तरीही भीतीच
सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झालेल्या घटनेला सात दिवस उलटले असले तरी हे प्रकरण अद्यापही वलयांकितच आहे. कारण या हल्ला प्रकरणाची भीती अद्यापही लोकांमध्ये आहे. रामा काणकोणकर यांच्यावर बांबोळी इस्पितळात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सुधारत असली तरी त्यांच्यावर झालेला हल्ला पाहता पुन्हा असा हल्ला होऊ नये कशावरून, हाही संशय आहेच. त्यामुळेच रामा काणकोणकर यांना बांबोळी इस्पितळात आणखी काही दिवस उपचारासाठी ठेवणे गरजेचे आहे.
काल, बुधवारी पणजी न्याय दंडाधिकारी प्रथम न्यायालयाने आठ संशयितांना दोन दिवसांची कोठडी वाढवून दिलेली आहे. त्यामुळे पोलिसांवर आता ह्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आणखी जोमाने काम करावे लागणार आहे. अन्यथा या संशयितांसाठी जामीन अर्ज न्यायालयात येऊ शकतो. जामीन अर्ज आल्यानंतर न्यायालयामार्फत न्यायालयीन कोठडीही दिली जाऊ शकते. त्याचबरोबर संशयितांना जामीन मिळू नये, यासाठी पोलिसही प्रयत्न करू शकतात आणि पोलिसांनी तशी तयारी ठेवली आहे. तरीही संशयितांना कायद्याने जामीन मागण्याचा अधिकार असल्याने ते जामिनावर सुटण्याची शक्यताही नाकारता येत नाही. म्हणून पोलिसांनी संशयितांना जामीन मिळण्यापूर्वीच ह्या प्रकरणाच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे.
रामा काणकोणकर हे प्रकरण राजकीयदृष्ट्या जरी रंग चढणारे असले तरी कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार केल्यास असा हल्ला पुन्हा झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असे लोकांचे म्हणणे आहे. 18 सप्टेंबर रोजी झालेल्या या हल्ला प्रकरणामुळे राज्यात भीतीचे वातावरण पसरले होते. अनेक संघटना, राजकीय पक्षांनी विरोधही झाला होता. आता ह्या प्रकरणाला सात दिवस उटलले असले तरी संशयित गुन्हेगार यातून सुटू नयेत, अशीच जनभावना आहे. दोन दिवसानंतर संशयितांना जामीन मिळाल्यास पुढे काय? हा प्रश्न असल्यामुळे पोलिसांनी त्यादिशने तपासाला पूर्णऊप देण्याची गरज आहे.









