सुरक्षेसाठी बुलेटप्रूफ वाहने तैनात करणार
वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाब पोलीस दलातील अधिकारी दहशतवादी आणि गँगस्टरांच्या निशाण्यावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य सरकारने त्यांची सुरक्षा वाढविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काही काळापूर्वी पकडलेल्या दहशतवादी आणि गँगस्टर्सनी वरिष्ठ पोलीस अधिकारी आपले लक्ष्य असल्याचे चौकशीदरम्यान उघड केले होते. त्यानंतर सरकारने पोलिसांना ‘बुलेटप्रुफ’ सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.
पंजाब पोलीस आपल्या अधिकाऱ्यांची सुरक्षा आणखी मजबूत करण्याच्या तयारीत आहे. रस्त्यावरून प्रवास करताना गँगस्टर किंवा दहशतवादी त्यांना लक्ष्य करू नयेत, यावर भर दिला जात आहे. या संदर्भात आता काही अधिकाऱ्यांची वाहने बुलेटप्रूफ करून त्यांना संरक्षण कवच देण्यात येणार आहे. पोलिसांनी या प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. यापूर्वी पोलिसांवर कोणीही हल्ला करू नये यासाठी आघाडीवर तैनात असलेल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना एके-56 आणि बुलेटप्रूफ जॅकेट पुरवले होते. तसेच सर्व पोलीस ठाण्यांच्या व पोलीस संस्थांच्या सीमाभिंतींची उंचीही वाढविण्यात आली होती.
गेल्या दीड वर्षांत पंजाब पोलीस गँगस्टर आणि दहशतवाद्यांविरोधात कठोर भूमिका घेत आहेत. सातत्याने कारवाया करून त्यांचे कंबरडे देशातच नाही तर परदेशातही मोडले जात आहे. अशा परिस्थितीत आता हे गुन्हेगार पोलिसांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्यावषी त्यांनी मोहाली येथील पंजाब पोलिसांच्या गुप्तचर मुख्यालयावर आणि नंतर तरनतारनमधील सरहाली पोलीस स्टेशनवर आरपीजी हल्ले करून दहशत पसरवली होती. या हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी यानंतर पोलिसांशी संबंधित संस्थांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस स्थानकांवरील असे हल्ले रोखण्यासाठी राज्यातील गृह विभागाने पोलिसांनी अधिकाधिक सुरक्षितता प्रदान करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
काही काळापूर्वी अटक करण्यात आलेल्या दहशतवादी आणि गँगस्टरांच्या चौकशीदरम्यान पंजाब पोलीस दलातील काही अधिकारी आपले लक्ष्य असल्याचे नमूद केले होते. यानंतर अधिकाऱ्यांची सुरक्षा अधिक मजबूत करण्याचे काम सुरू आहे. पोलीस लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करतील, अशी अपेक्षा आहे.









