नितेश चोडणकरच्या विरोधात गुन्हा नोंद
पणजी : पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांना आजारपणाची सुट्टी घेण्यासाठी किंवा अन्य सरकारी कामांसाठी आवश्यक असलेल्या सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय प्रमाणपत्राऐवजी डॉक्टरची बनावट सही, बनावट स्टॅम्पने तयार केलेले बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र देणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे. पोलीस खात्याने याबाबत चौकशी सुऊ केली असून सहा बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रे उघडकीस आली आहेत. त्यामुळे ज्यांनी या कॉन्स्टेबलकडून बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रे घेतली आहेत, त्यांचे धाबे दणाणले आहेत. हा प्रकार गेल्या दोन वर्षापासून सुऊ होता.
मुख्य संशयित नितेश चोडणकर (कॉन्स्टेबल क्र. 6780, राहणारा मये डिचोली) याच्या विरोधात पणजी पोलिसांनी भादंसंच्य कलम 465, 468, 473, 471, व 420 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. बोगस वैद्यकीय प्रमाणपत्राबाबत सर्व पोलिसस्थानके तसेच इतर पोलीस विभागांना कळविण्यात आले आहे. पोलीस खात्याबरोबरच इतर सरकारी खात्यातही बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रे दिली असण्याचा संशय असून त्याबाबतही पोलीस तपास करीत आहेत.
मये येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. सिद्धी एस. कासार यांनी या प्रकाराबाबत डिचोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. नंतर ती पणजी पोलिसांकडे पाठविण्यात आली. पणजी पोलिसांनी याबाबत तपास करून नितेश चोडणकर या कॉन्स्टेबलवर कारवाई केली आहे. पणजी पोलीस स्थानकात त्याने 2022 सालात बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर केल्याचे उघड झाले आहे. त्याने वैद्यकीय प्रमाणपत्र अर्जावर डॉ. सिध्दी एस. कासार यांची बनावट स्वाक्षरी केली आहे. तसेच स्टॅम्पदेखील बनावट तयार करून वापरला आहे.









