ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील पंपोर भागात रात्री उशिरा दहशतवाद्यांनी एका पोलीस उपनिरीक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली. फारुख अहमद मीर असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फारुख अहमद मीर हे आयआरपीच्या 23 व्या बटालियनमध्ये होते. सध्या ते सीटीसी लेठीपोरा येथे तैनात होते. शुक्रवारी रात्री दोन ते तीन दहशतवाद्यांनी त्यांचे राहत्या घरातून अपहरण करुन त्यांना भातशेतात नेले. तिथे गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. भातशेतीत छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडलेला मीर यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेमागे कोणत्या संघटनेचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने स्थानिकांची चिंता वाढली आहे. मे महिन्यापासून आतापर्यंत सातहून अधिक जणांची टार्गेट किलिंगमध्ये हत्या करण्यात आली आहे.









