पोलीस व्हॅनमधून पळून जाण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी/ सातारा
कोरेगाव जुना मोटार स्टँडसमोर पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगाराने पोलीस उपनिरीक्षकाला दमदाटी करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. विशाल अंकुश कदम असे मारहाण झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून अक्षय लालासाहेब पवार असे त्या गुन्हेगाराचे नाव आहे.
याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले की, कोरेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत उपनिरीक्षक विशाल अंकुश कदम (वय 32) हे शुक्रवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास पेट्रोलिंग करण्यासाठी कोरेगाव पोलीस ठाण्यातून खासगी वाहनाने जुन्या मोटार स्टँडसमोर गेले. तेथे त्यांना वाहतूक कोंडी झाल्याचे निदर्शनास आले.
त्यावेळी एक काळ्या रंगाची गाडी (एमएच 11 ः एएफ 1) सातारा बाजूकडे तोंड करून उभी होती. या गाडीच्या बाजूला अक्षय लालासाहेब पवार (रा. खंडोबाचा माळ, सातारा) आणि सराईत गुन्हेगार संकेत राजू जाधव (रा. कोरेगाव) हे दोघे आरडाओरडा करत होते. काळ्या रंगाची गाडी आणि पवार व जाधव यांच्यातील वादामुळे तेथे वाहतूक कोंडी झाली होती.
ही कोंडी सुटावी म्हणून पीएसआय कदम यांनी पवार आणि जाधव यांना सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालू नका. तुमची गाडी बाजूला घ्या, असे सांगितले. त्यावर पवार याने कदम यांच्याकडे पाहून एकदम साहेब ही गाडी माझीच आहे. डॉन परत कोरेगावला आला आहे. लोकांना कळू द्या, असे ओरडून सांगितले. दोघांत वादावादी सुरू झाली. गाडय़ा बाजूला काढा अन्यथा मला तुमच्यावर कायदेशीर कारवाई करावी लागेल, असे पीएसआय कदम यांनी सांगितले.
त्यावर पवार याने पीएसआय कदम यांची कॉलर पकडून धक्काबुक्की करत मारहाण केली. हा प्रकार सुरू असतानाच कोरेगाव पोलीस ठाण्यातील अंमलदार श्री. साळुंखे, पोलिस नाईक पवार, घाडगे, पोलिस कॉन्स्टेबल जाधव तेथे आले. यांनी बळाचा वापर करत पवारला पोलीस ठाण्यात आणले. त्यावेळी जाधव हा त्यांच्या गाडीतून पळून गेला. दरम्यान, याप्रकरणी कोरेगाव पोलीसांत अक्षय पवार व संकेत जाधव या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगावचे पोलिस निरीक्षक नितीन सावंत अधिक तपास करत आहेत.








