धुळेर येथे दोघा संशयितांना अटक, गांजासह चारचाकी जप्त
पणजी : धुळेर-म्हापसा येथील पेट्रोल पंपाजवळ चार चाकी वाहनातून होत असलेली गांज्याची तस्करी रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. हा प्रकार धुळेर येथे घडला असून, चार चाकी वाहनासह महाराष्ट्रातील दोघा संशयितांना गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, धुळेर-म्हापसा येथे एका पेट्रोल पंपाजवळ चार चाकी वाहनातून गांजाची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेला खबऱ्याकडून प्राप्त झाली होती. पांढऱ्या रंगाची कार अमलीपदार्थ विक्रीसाठी फिरत असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले होते. पोलिसांनी साध्या वेशात या चारचाकी वाहनाचा शोध सकाळी 6.30 वाजता घेतला.
त्यानंतर या चारचाकी वाहनाच्या डिकीत सुमारे 30 किलो गांजा पोलिसांच्या हाती लागला. या गांजाची किंमत 40.10 लाख ऊपये इतकी आहे. पोलिसांनी सुखदेव कोळी (वय 21, सावेलदे-धुळे) व रवींद्र भिल (वय 24, रा. शिरपुरे-धुळे) या दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून मोबाईल संचही हस्तगत करण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक राजेश कुमार याच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विकास दयेकर याच्या नेतृत्वाखाली साहाय्य्क उपनिरीक्षक श्रीराम साळगावकर, दिनेश पिकुळकर, काँन्स्टेबल सुलेश नाईक, क्रितेश किनाळकर, सुभा गावकर, प्रकाश उत्तेकुरी व इतर पथकाने कारवाईत भाग घेतला. दोघाही संशयितांना न्यायालयात उभे केले असता त्यांना पोलिस कोठडी देण्यात आल्याचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सांगितले.









