प्रवीण आसोलकर यांची म्हापसा पोलिसांत तक्रार
प्रतिनिधी /म्हापसा
गेल्या पालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरलो होतो. प्रभागातील कामे घेऊन पालिकेत जातो. गावातील नागरिक आपल्याकडे कामासाठी येत असल्याने विरोधक आपल्यास धमकी देऊन कुठल्या तरी प्रकरणात गंतवू पाहत आहेत. या प्रकरणी गावातील तिघांची नावे आपण म्हापसा पोलीस स्थानकात दिली आहे. काही परप्रांतीय आपल्यास जीवे मारण्यास पाहत असून त्यांच्यावर म्हापसा पोलिसांनी कारवाई करावी, अशी लेखी मागणी प्रवीण आसोलकर यांनी केली आहे.
या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक, आयजीपी आदींना देण्यात आल्या आहेत. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे सलीम मुल्ला, स्वप्नील वायंगणकर, इमाम मुल्ला यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. ते साईबाबा मंदिर डांगी कॉलनी म्हापसा येथील रहिवासी असून जीवे मारण्याची धमकी देत आहेत. तसेच आपल्यावर खोटी विनयभंगची तक्रार करण्याचा त्यांचा इरादा असून तशा आशयाचा आवाज रेकॉर्ड करून पोलिसांना सादर केला असल्याचे आसोलकर यांनी सांगितले.
म्हापशात छोटी गँग तयार : सिद्धार्थ मांद्रेकर
प्रवीण आसोलकरांना पाठिंबा देण्यासाठी म्हापसा पोलीस ठाण्यात मोठय़ा संख्येने युवा वर्ग सहभागी झाला होता. यावेळी बोलताना सिद्धार्थ मांद्रेकर म्हणाले की, काही तरुण मुले लहान मुलांची गँग करून क्षुल्लक कारणावरून भांडणे करतात. त्यांच्या पॉकेटमध्ये सुरा, ब्लेड आदी हत्यारे असतात. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. हडफडेची पुनरावृत्ती म्हापशात नको. यावेळी रुपेश राऊत यांनीही आसोलकर यांना पाठिंबा असल्याचे सांगितले.









