सातारा :
सातारा तालुका पोलिसांनी महाराष्ट्रासह परराज्यातून गहाळ झालेले 11 लाख 40 हजार रुपयांचे 76 मोबाईल फोन हस्तगत केले आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांनी हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या सीईआयआर पोर्टलचे कामकाज करणारे व डीबी पथक यांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सीईआयआर पोर्टल व तांत्रिक बाबींच्या आधारे महाराष्ट्रातून तसेच परराज्यातून वेगवेगळया जिल्ह्यातून हस्ते परहस्ते वारंवार संपर्क करुन चिकाटीने ही मोहीम राबवली. सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीrत गहाळ झालेले एकुण 11 लाख 40 हजार रुपये किमतीचे एकुण 76 मोबाईल हस्तगत करण्यात यश आले आहे. ही मोहीम वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली आहे. 53 मोबाईल लोकांना परत केलेले आहेत. तसेच उर्वरित 23 मोबाईल हे परत देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय अधिकारी राजीव नवले, तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, विनोद नेवसे, हवालदार राजू शिखरे, मनोज गायकवाड, पंकज ढाणे, दादा स्वामी, विद्या कुंभार, प्रदीप मोहिते, संदीप पांडव, सीईआयआर पोर्टलचे कामकाज पाहणारे वर्षा देशमुख, फणसे यांनी केलेली आहे.
सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे पोलीस तुषार दोशी, अपर अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागीय राजीव नवले यांनी अभिनंदन केले.








