न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याशी संबंधित प्रकरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी सापडलेल्या कोट्यावधींच्या रोख रकमेचे प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. या प्रकरणात बुधवारी दिल्ली पोलीस त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांचे स्टोअर रुम आणि आजूबाजूचा परिसर सील करण्यात आला. चौकशी समितीच्या सूचनेनुसार ज्याठिकाणी आग लागली ती जागा सील करण्यात आली आहे. नवी दिल्लीचे डीसीपी देवेश कुमार महाला हे बुधवारी आपल्या पथकासह घटनेच्या ठिकाणी पोहोचले होते. पोलिसांच्या पथकाने संपूर्ण स्टोअररुम आणि आजूबाजूचा परिसर सील केला.
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी तीन न्यायाधीशांची अंतर्गत समिती करत आहे. एकीकडे याप्रकरणी चौकशी सुरू असतानाच त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर याची सुनावणी होणार आहे. याचिकेत एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसोबतच न्यायव्यवस्थेच्या सर्व स्तरांवर भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारला प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचे अधिकृत निवासस्थान दिल्लीतील 30 तुघलक रोड येथे आहे. त्यांच्या सरकारी निवासस्थानातून जळालेल्या नोटांचे गठ्ठे सापडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एक व्हिडिओ जारी केला होता. या व्हिडिओमध्ये न्यायाधीशांच्या अधिकृत निवासस्थानी नोटांचे गठ्ठे जळालेले दिसत आहेत. त्यापाठोपाठ वर्मा यांच्या सरकारी निवासस्थानाबाहेर 500 रुपयांच्या अर्धवट जळालेल्या नोटाही आढळल्या होत्या.









