सातारा :
पत्नीशी झालेल्या घरगुत्ती वादातून युवकाने अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकास पोलिसांनी वाचवले. सातारा पोलिसांच्या सतर्कतेमुळे शांताराम लक्ष्मण पवार (वय 24 रा. समर्थनगर, सातारा) या युवकाचे प्राण वाचले आहेत. सातारा पोलिसांच्या तत्परतेबद्दल कौतुक केले जात आहे.
या संदर्भात सातारा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान शहर पोलीस ठाण्यास संदेश प्राप्त झाला की एक युवक आत्महत्या करण्यासाठी अजिंक्यतारा किल्ल्यावर मागील बाजूस गेला आहे. या बाबत शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी तातडीने दखल घेत गस्तीवरील बिट मार्शल, डीबी पथक युवकाचा शोधासाठी रवाना केले.
यावेळी मोबाईल पीसीआरमधील पोलीस शिपाई बनकर, महिला पोलीस अंमलदार महाडिक यांना अजिंक्यतारा किल्ल्याच्या दक्षिण दरवाजा परिसरात एक युवक आत्महत्या करण्याचा तयारीत असल्याचे दिसले. यावेळी त्यांनी युवकाशी संवाद साधत त्याची समजूत काढली. याच वेळी सातारा डीबी आणि शाहूपुरी डीबी पथकही दाखल झाले. या पथकाने आत्महत्या करण्याच्या मन:स्थितीत असलेल्या या युवकाचे समुपदेशन करत धीर देत त्याला ताब्यात घेतले.
शांताराम लक्ष्मण पवार याने पत्नीशी झालेल्या वादातून नैराश्याने आपण हे पाऊल उचलत होते असे सांगितले. सातारा पोलिसांनी युवकास ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाणे येथे त्याच्या नातेवाईकांना बोलावून त्यांच्याशी या घटनेबद्दल सविस्तर समुपदेशन करून युवकास नातेवाईकांच्या ताब्यात दिले..








