रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी शहरात चालणाऱ्या एका मोठ्या तीनपत्ती जुगारावर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. यावेळी 4 ते 5 लाख रूपयांची रोकड घेवून जुगार खेळला जात असताना केवळ 44 हजार रूपयांची रोकड जप्तीची नोंद करण्यात आली. त्यामुळे उर्वरित रक्कम नेमकी गेली कुठे, पैशाला पाय फुटले की काय? असा प्रश्न जुगारातील संशयितांना पडला आहे.
गणेशोत्सवात रत्नागिरी तालुक्यातील विविध ठिकाणी तीनपत्ती जुगार खेळला जातो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पैशाचे व्यवहार होतात. वर्षानुवर्षे हे प्रकार चालत असल्याने या बाबत पोलिसांना त्यांची बित्तंबातमी मिळत असते. असाच एक तीनपत्ती जुगार मुरूगवाडा येथे चालतो. या प्रकाराची नेहमीप्रमाणे यावर्षीही पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांकडून रात्रीच्या सुमारास पथक तयार करून छापा टाकण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने लोक जुगार खेळण्यासाठी उपस्थित असल्याचे पोलिसांना आढळले. यातील अनेकांनी पोलिसांना बघताच त्या ठिकाणाहून पळ काढला. मात्र 13 जण व एक मोठी रक्कम पोलिसांच्या हाती लागली. मात्र मोजल्यानंतर ही रक्कम केवळ 44 हजार रूपये इतकीच निघाली. याचे संशयितांना देखील मोठे आश्चर्य वाटल़े. दरम्यान अशापकारे तीनपत्ती जुगारावर धडाकेबाज कारवाई करण्यात यावी, असे आदेश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले आहेत. त्यानुसार येत्या काही दिवसांत आणखी अशाप्रकारे कारवाई होण्याची शक्यता आहे.









