लोणावळा / वार्ताहर :
वेहेरगावातील गावठी हातभट्टीवर लोणावळा पोलिसांनी छापेमारी करत 1600 लीटर दारू जप्त केली.
याप्रकरणी नेताराम धरम सिंग राठोड (वय 40, रा. कांजारभट वस्ती, वेहेरगाव, तालुका मावळ) याच्यावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 65 ई फ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई केतन महादु तळपे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेहेरगाव हद्दीतील कंजारभट वस्तीजवळील माळ रानात नेताराम राठोड हा बेकायदा गावठी हातभट्टीची दारू तयार करत होता. यासंदर्भात माहिती मिळताच लोणावळा पोलिसांनी त्या ठिकाणावर छापेमारी केली. त्यावेळी राठोड हा हातभट्टीची दारू तयार करताना आढळला. पोलिसांनी त्या ठिकाणाहून आठ प्लॅस्टिकच्या ड्रममधून 1600 लीटर दारू, दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन जप्त पेले आहे. ज्याची किंमत 80 हजार रुपये आहे. लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश होळकर पुढील तपास करत आहेत.








