ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यात किराणा दुकानावर छापा टाकून पोलिसांनी 65 लाख 19 हजारांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी दुकानदार रमेश चौधरी याला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हवेली तालुक्यातील श्रीरामनगरमध्ये एक किराणा दुकानदार बेकायदा गुटखा विक्री करत असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राजगड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने त्याच्या दुकानावर छापेमारी केली. यावेळी दुकानात विक्रीस बंदी असलेला गुटखा, सुगंधी सुपारी आणि सुगंधी तंबाखूचे काही बॉक्स आणि पोती आढळून आली. चौकशीदरम्यान या दुकानदाराचे शिंदेवाडी येथे गोडाऊन असल्याचे समजले. पोलिसांनी या गोडाऊनवरही छापा टाकला. त्यावेळी तिथेही गुटख्याची पोती आढळून आली. पोलिसांनी दोन्ही ठिकाणचा 65 लाख 19 हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. राजगड पोलीस अधिक तपास करत आहेत.
अधिक वाचा : निवडणुकांसाठी सत्ताधाऱ्यांकडून जातीय तेढ निर्माण केली जातेय