सांगरूळ / गजानन लव्हटे :
करवीर तालुक्यातील सांगरूळ येथे लाखो रुपये खर्च करून बांधलेले पोलीस निवासस्थान पूर्णपणे निकामी झाले आहे. इमारत झाडाझुडपामध्ये पूर्णपणे झाकली गेली असून मोडकळलेल्या इमारतीचा गैरवापर वाढल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. इमारतीची पडझड झाल्याने भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे . पोलीस चौकीत कायमस्वरूपी पोलीस उपस्थित नसल्याने पोलीस चौकीचे अस्तित्व असून नसल्यासारखे आहे . सध्या ग्रामपंचायतकडे एक गुंठा ही गावठाण शिल्लक नाही .ही जागा ग्रामपंचायतीकडे पूर्ववत हस्तांतरित केल्यास या ठिकाणी सुसज्ज इमारत उभी करून ग्रामस्थांना विविध प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देता येतील .अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाकडून होत आहे .
करवीर पोलीस ठाण्याच्या कक्षेत तालुक्यात एकूण आठ पोलीस दूरक्षेत्र कार्यालय आहेत. यामध्ये सांगरूळ पोलीस दूरक्षेत्र कार्यालयाच्या कक्षेत सांगरूळसह कुडित्रे कोपार्डे अडूर कळंबे भामटे चिंचवडे बहिरेश्वर म्हारूळ खटांगळे पासार्डे पाचाकटेवाडी आमशी व वाघोबावाडी बोलोली व अंतर्गत शिपेकरवाडी कारंडेवाडी स्वयंभूवाडी दुर्गुळवाडी मठाचा धनगरवाडा उपवडे व अंतर्गत आरडेवाडी बेंडाईवाडा न्हाव्याची वाडी या गावातील व वाड्या वस्तीतील लोकांच्या तक्रारीची दखल घेणे या बरोबरच कायदा व सुव्यवस्थेचे नियंत्रण राखण्यासाठी या पोलीस दूरक्षेत्र कार्यालयाची निर्मिती झाली आहे.

- पोलीस चौकी असून नसल्यासारखी
या दूरक्षेत्राचे कामकाज पाहण्यासाठी तीन पोलीस कॉन्स्टेबल कार्यरत आहेत . या पोलिसांना इतरत्र ड्युटी लावल्याने आठवड्यातून एका दुसरा दिवसच पोलीस या ठिकाणी उपस्थित असतात. अधिक करून या दूरक्षेत्र कार्यालयाचा दरवाजा बंद नेहमी स्थितीत असलेला पाहायला मिळतो. या दूरक्षेत्राच्या कार्यक्षेत्रात वाड्या आणि वस्त्या यांचा समावेश आहे. यापैकी अनेक ठिकाणी अद्यापही वाहतुकीची सुविधा उपलब्ध नाही. या भागातील लोकांना आपल्या तक्रारी नोंद करण्यासाठी सात–आठ किलोमीटर पायपीट करत वाहतुकीची सुविधा असणाऱ्या गावापर्यंत यावे लागते. तेथून एसटी किंवा एखादे खासगी वाहन करून ही चौकी बंद असल्याने कोल्हापूरला जावे लागते .यामुळे या भागातील गोरगरीब नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसण्याबरोबरच वेळेचा ही अपव्यय होतो .
- पोलीस कधी राहिलेच नाहीत
सांगरूळ पोलीस दूरक्षेत्रच्या कार्यक्षेत्राची भौगोलिक परिस्थिती पाहता डोंगरी भागातील वाड्या वस्तूंचा विचार करून सांगरुळ चौकीमध्ये कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना निवासाची व्यवस्था असावी म्हणून सन 1990 च्या सुमारास लाखो रुपये खर्चाचे हे निवासस्थान बांधण्यात आले. पोलीस चौकी बरोबर पोलीस निवासस्थान असल्याने पोलीस वर्दीचा वचक निर्माण झाला होता . पण निवासस्थान बांधल्यापासून या इमारतीत अपवाद वगळता पोलीस कधी मुक्कामास राहिल्याचे दिसलेच नाही. वापराविना या इमारतीची दुरावस्था झाली आहे .
- इमारतीची सध्याची अवस्था
वापराविना पडून असल्यामुळे ही इमारत हळूहळू मोडकळीस आली . या इमारतीचे दरवाजे पूर्णपणे निकामी झाले आहेत .खिडक्यांची मोडतोड होण्याबरोबरच इमारतीच्या भिंतींची पडझड झाली आहे. इमारतीच्या समोर व इमारतीच्या छतावर झुडपांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून इमारतीची दर्शनी बाजू पूर्णपणे झुडपांच्या मध्ये झाकली गेली आहे .इमारतीच्या आतील भागाची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली आहे .या भग्न झालेले इमारतीत भटक्या कुत्र्यांचा वावर व उंदीर घुशींचे साम्राज्य वाढल्याने दुर्गंधी पसरली आहे .दरवाजे मोडल्याने इमारतीस स्वच्छातागृह सदृश स्वरूप निर्माण झाले आहे .
- मध्यवर्तीं ठिकाणाची जागा वापराविना पडून
परिसरातील गावांची सोय म्हणून मोठ्या अपेक्षेने ग्रामपंचायतीने गट नंबर 602 मधील गावठाण मधील ग्रामपंचायतीच्या मालकीची मध्यवर्ती ठिकाणी असणारी पोलीस दूरक्षेत्र कार्यालयाजवळची ही जागा पोलीस निवासस्थान बांधण्यासाठी दिली होती. 39 फुट लांबी व 34 फूट रुंदी असलेली 1326 चौरस फूट क्षेत्रफळाची ही जागा आहे . सर्व सोयीने युक्त असे चांगले बांधकाम करून सुसज्य पोलीस निवासस्थान बांधण्यात आले होते . सध्या या जागेची सिटी सर्व्हेला करवीर पोलीस स्टेशन अशी नोंद आहे .
गावात इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीकडे सध्या गावठाणात हक्काची जागा नाही. ही जागा ग्रामपंचायतला पूर्ववत द्यावी व त्या बदल्यात ग्रामपंचायत इतरत्र जागा उपलब्ध करून देईल अशी मागणी करवीर पोलीस स्टेशनकडे ग्रामपंचायतने वारंवार केली आहे .या मागणीचाही अद्याप विचार झालेला नाही .
- जागेचा योग्य पुनर्वापर करता येईल
पोलीस निवासस्थानाची ही जागा ग्रामपंचायत कार्यालयाला लागून मध्यवर्ती ठिकाणी आहे. या इमारतीच्या सभोवताली सेवा संस्था दूध संस्था ग्रामपंचायत केडीसीसी बँक व महाराष्ट्र बँक शाखा आहेत. यामुळे येथे नेहमी नागरिकांची वर्दळ सुरू असते. पोस्ट ऑफिस तलाठी मंडल अधिकारी कार्यालय पाटबंधारे विभाग कार्यालय यासारखी ग्रामस्थांना सेवा पुरवणारी अनेक प्रकारची कार्यालये ज्याच्याशी ग्रामस्थांचा सातत्याने संपर्क येतो अशी कार्यालये ग्रामपंचायत व इतर सहकारी संस्थांच्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर कार्यरत आहेत. वयस्कर लोकांना यामुळे गैरसोयीचे होते. वापरावींना पडून असलेली पोलीस निवासस्थानाची जागा ग्रामपंचायतीकडे पूर्ववत दिल्यास या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून इमारत उभा करून शासकीय कार्यालयांच्या बरोबरच ग्रंथालय किंवा अभ्यासिका यासारख्या इमारती उभा करणे शक्य होईल .
- जागा ग्रामपंचायतीकडे परत मिळावी
गावासह परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य म्हणून ग्रामपंचायतीने पोलीस निवासस्थानासाठी ही मध्यवर्ती ठिकाणची जागा दिली आहे .या इमारतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करताना प्रशासकीय इमारत प्रशस्त व्हावी म्हणून ही जागा ग्रामपंचायतीने परत मागितली होती .त्या बदलात दुसरी जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता .पण करवीर पोलीस स्टेशन कडून प्रतिसाद न मिळाल्याने उपलब्ध जागेत ग्रामपंचायत इमारत बांधकाम करून ग्रामस्थांना प्रशासकीय सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे .ही जागा ग्रामपंचायत परत दिल्यास सुविधा देणाऱ्या केंद्रांची उभारणी करता येईल .
शितल बदाम खाडे, सरपंच ग्रामपंचायत सांगरुळ
- कायमस्वरूपी पोलीस अंमलदाराची नेमणूक करावी
सांगरूळ पोलीस चौकीसाठी कागदोपत्री तीन पोलीस कॉन्स्टेबलांची नियुक्ती आहे. या पोलिसांना इतरत्र ड्युट्या लावल्याने या ठिकाणी पोलिसांची उपस्थिती दुर्मिळ असते. यामुळे परिसरात एखादा गुन्हा किंवा तक्रार घडल्यास नागरिकांना वेळेचा व पैशाचा अपव्ययाबरोबरच प्रवासाचा त्रास सहन करत कोल्हापूरला जावे लागते. मग या ठिकाणी पोलीस चौकी असून उपयोग काय ? या पोलीस चौकीसाठी कायमस्वरूपी पोलीस अंमलदार नियुक्त करावा त्यामुळे परिसरातील नागरिकांची सोय होईल.
– पै सुशांत नाळे, ग्रा पं .सदस्य








