पोलिसांकडून खबरदारी, दिवसभर पोलीस वाहनांवर लक्ष ठेवून
बेळगाव : महापौर मंगेश पवार यांच्या सरकारी वाहनावरील मराठी भाषेतील नामफलक हटविण्यात आल्यानंतर त्यांनी वाहनाचा वापर करणे बंद केले होते. गेल्या काही दिवसांपासून ते स्वत:च्या खासगी वाहनावरून ये-जा करत होते. त्यामुळे सरकारी वाहन महापालिका आवारात थांबून होते. ही बाब लक्षात येताच महापालिकेने महापौर व उपमहापौरांच्या वाहनांवर कानडीसह इंग्रजी भाषेत महापौर व उपमहापौर असा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर इंग्रजी भाषेतील नंबरप्लेट बसविण्यात आली आहे. त्यामुळे महापौर मंगेश पवार यांनी पुन्हा सरकारी वाहनाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार महापालिकेत मनपा आयुक्तांनी सर्वत्र कानडीकरण केले आहे. त्यामुळे मराठी भाषिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महापौर मंगेश पवार हे जरी राष्ट्रीय पक्षातून निवडून आले असले तरी ते मराठी भाषिक आहेत.
मात्र त्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता त्यांच्या वाहनावरील मराठीत महापौर असा नामोल्लेख असलेला फलक हटविण्यात आला होता. बेळगावात मराठी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे. पूर्वीपासून महापौर व उपमहापौरांच्या वाहनांवर मराठी भाषेतील नामफलक होता. मात्र परंपरेला हरताळ फासत मनपा आयुक्तांनी वाहनांवरील नामफलक हटविल्याने हा प्रकार महापौर मंगेश पवार यांच्या जिव्हारी लागल्याचे बोलले जात होते. त्यामुळेच त्यांनी आपल्या सरकारी वाहनाचा वापर करणे बंद केले होते. काही दिवसांपासून ते स्वत:च्या वाहनातून महापालिकेकडे ये-जा करत होते. मनपा आयुक्तांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी महापौर व उपमहापौरांच्या वाहनावर कानडीबरोबरच इंग्रजी भाषेतील नामफलक लावले आहेत. इतकेच नव्हेतर इंग्रजी अक्षरातील नंबरप्लेट बसविली आहे. त्यामुळे महापौरांनी पुन्हा वाहनाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
वाहनांवर पुन्हा इंग्रजी भाषेतील फलक बसविले
एकीकडे महापालिकेत सर्वत्र कानडीकरण होत असताना दुसरीकडे महापौर व उपमहापौरांच्या वाहनांवर पुन्हा इंग्रजी भाषेतील फलक बसविण्यात आले आहेत. त्यातच गुरुवारी महापालिकेची सर्वसाधारण बैठक आयोजित करण्यात आली होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून मार्केट पोलिसांनी महापालिकेसह महापौरांच्या वाहनाला बंदोबस्त दिला होता. पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर यांच्यासह तीन पोलीस उपनिरीक्षक, एक केएसआरपीची तुकडी व इतर पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर होते.









