कोलकाता बलात्कार प्रकरणाला वेगळे वळण, डीएनए चाचणीत एकच गुन्हेगार असल्याचे स्पष्ट
वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालमधील महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी दबाव आणल्याचा आरोप पिडितेच्या मातापित्यांनी केला आहे. पिडीतेच्या मृतदेहाचे दहन लवकरात लवकर करावे, यासाठी पोलिसांनी लाच देऊ केली होती, असा आरोप त्यांनी गुरुवारी केला होता. मात्र, त्यांचा एक व्हिडीओ प्रदर्शित करून हा आरोप खोटा असल्याचा दावा तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला होता. तथापि, पोलिसांनी दबाव आणल्यानेच व्हिडीओत आपण अशी विधाने केली असल्याचा नवा आरोप पिडितेच्या आईवडिलांनी केल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
या प्रकरणात, मृतदेहाचे दहन घाईघाईने केल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी महाविद्यालयाचे प्रशासन आणि पोलिसांनी दबाव आणला. तसेच लाचही देऊ केली असा आरोप प्रथम पिडीतेच्या आईवडिलांनी केला होता. तथापि, घटना घडल्यानंतर त्यांनीच आपल्याला पैसे देऊ केले गेले नव्हते आणि दबावही नव्हता, असे ते सांगत असल्याचा व्हिडीओ तृणमूल काँग्रेसकडून प्रसारित करण्यात आला होता. आता या व्हिडीओतील वक्तव्य आपण पोलिसांच्या दबावाखाली केले होते. आपल्याला घाबरविण्यात आले होते, असा आरोप मातापित्यांनी केला आहे. महाविद्यालयाच्या व्यवस्थापनानेच घाईघाईने मृतदेहाचे दहन केले. त्यांनी आम्हाला विचार करण्यास वेळ दिला नाही, असे मातापित्यांचे म्हणणे आहे.
डीएनएचा अहवाल
पिडितेच्या डीएनए चाचणीत गुन्हा करणारी एकाच व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे डीएनए अहवालानुसार हे सामुहिक बलात्काराचे प्रकरण नाही, असा दावा करण्यात येत आहे. तथापि, हे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी देण्यापूर्वी बरेच पुरावे नष्ट करण्यात आले आहेत, असे सीबीआयनेच स्पष्ट केले होते. त्यामुळे डीएनए अहवालानंतरही सीबीआय सर्व शक्यता गृहित धरुन तपास करीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
याचिका फेटाळली
आपल्या विरोधातील भ्रष्टाचाराचे प्रकरणही सीबीआयकडे तपासासाठी देण्याच्या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आर. जी. कर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळली आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य असून सर्वोच्च न्यायालय त्यात कोणताही फेरफार करणार नाही, असे स्पष्ट करण्यात आल्याने संदीप घोष यांनी दणका बसला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधातली सीबीआय चौकशी सुरु राहणार आहे. त्यांना गुरुवारी पैशाचा गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणी अटकही करण्यात आली आहे.
पुरावे गोळा करण्याचे काम सुरुच
सीबीआयच्या हाती प्रकरण येण्यापूर्वी घटनास्थळाच्या स्वरुपात बरेच बदल करण्यात आले होते. त्यामुळे पुरावे शोधणे कठीण जात आहे. तथापि, सीबीआयचे अधिकारी सर्व बारीक सारीक पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करीत असून हे काम अद्यापही होत आहे. पुरावे नष्ट करण्याप्रकरणीही सीबीआय संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी संजय रॉय याच्या विरोधात आरोपपत्र लवकरच सादर केले जाणार असून त्यानंतर न्यायालयात त्याच्यावर बलात्कार आणि हत्या यासंबंधी अभियोग चालविण्यात येणार आहे. सध्यातरी हा एकच आरोपी असल्याचे स्पष्ट करण्यात आले असले तरी सखोल चौकशीनंतरच या प्रकरणावर प्रकाश पडणार आहे. या प्रकरणाचा निर्णय लवकरात लवकर लागावा यासाठी ते जलदगती न्यायालयात चालविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.









