वाहनांसह पोलिसांची शस्त्रे जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली
वृत्तसंस्था /पाटणा
पाटणा येथील दानापूर पोलीस ठाण्यांतर्गत कार्यरत सगुणा मोड पोलीस चौकीला गुऊवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. पोलीस चौकीत ठेवलेल्या रायफल्स, 200 गोळ्या, फर्निचर आणि बरेचसे कागदपत्र जळून खाक झाले आहे. शहर पोलीस अधीक्षक राजेश कुमार यांनी याला दुजोरा दिला आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असल्याचेही त्यांनी सांगितले. दानापूर येथील सगुणा मोड येथे असलेल्या पोलीस चौकीच्या एका कोपऱ्यातून दुपारी अचानक धूर येऊ लागला. धूर निघत असल्याचे पाहून चौकीवर उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी तेथे धावले, मात्र काही वेळातच आगीने मोठे रूप धारण केले. आग लागल्यानंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दुपारच्या रणरणत्या उन्हादरम्यानच आग लागल्याने ती जलदगतीने पसरली. या घटनेबाबत तातडीने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्मयात आणेपर्यंत बरेचसे साहित्य जळून खाक झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्मयात आणण्यात यश मिळवले. घटनेची माहिती मिळताच सीटीएसपी पश्चिम राजेश कुमार, दानापूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी अभिनव धीमान यांच्यासह पोलीस ठाण्याचे प्रभारी फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास सुरू केला.









