प्रेमीयुगुल, नशेबाज तरुणांचा पुन्हा वाढला वावर : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी
बेळगाव : सावगाव परिसरात फिरणाऱ्या प्रेमीयुगुल आणि नशेबाज तरुणांवर आवर घालावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढला होता. मोर्चानंतर जागे झालेल्या बेळगाव ग्रामीण पोलिसांनी काही दिवस नानावाडी रोडवरील शेतवडी आणि धरण परिसरात गस्त वाढविली होती. मात्र सदर गस्त बंद झाल्याने परिसरात पुन्हा प्रेमीयुगुल आणि नशेबाज तरुणांचा वावर वाढला आहे.काही दिवसांपूर्वी नानावाडी रोडवरील सावगावच्या शेतवडीत फिरावयास आलेल्या प्रेमीयुगुलाला तरुणांनी हटकल्याने या प्रकरणाला वेगळे वळण देण्यात आले. युगुलाला समज देणाऱ्या तरुणांवर नैतिक पोलीसगिरी केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करून घेऊन अटक करण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांनी प्रेमीयुगुल आणि नशेबाज तरुणांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढला होता. गेल्या काही वर्षांपासून धरण परिसरात दिवसा तसेच रात्रीच्यावेळी नशेबाज तरुण धिंगाणा घालत आहेत.
निर्जनस्थळी ओल्या पार्ट्यांचे आयोजन करून त्याच ठिकाणी बाटल्या फोडल्या जात आहेत. सध्या काजू आणि आंब्याचा सिझन सुरू असल्याने शेतकरी शेताकडे जात आहेत. मात्र मद्यपी तरुणांचा वावर वाढल्याने महिला वर्गांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे लक्ष घालून पोलिसांनी कारवाई करण्याची गरज असतानाही सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले. धरणाच्या पाण्यात डुबक्या मारण्यासह गाण्याच्या आवाजावर धिंगाणा घालण्यात येत होता. त्याचबरोबर नानावाडी रोडवरील सावगावच्या शेतवडीत प्रेमीयुगुलांचा वावरही कायम आहे. मोर्चानंतर पोलिसांनी या दोन्ही ठिकाणी गस्त वाढविली होती. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या रोडावली होती. पण काही दिवसांपासून पोलिसांची गस्त कमी झाली असल्याने पुन्हा प्रेमीयुगुल आणि नशेबाज तरुणांचा वावर वाढला आहे. याचा त्रास महिला वर्ग आणि ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पुन्हा गस्त वाढवावी अशी मागणी केली जात आहे.
वाहनचालकांची अडवणूक
ग्रामस्थांनी मोर्चा काढल्यानंतर पोलिसांकडून नानावाडी रोडवर थांबून वाहनचालकांची अडवणूक केली जात आहे. वाहनांची कागदपत्रे तपासण्यासह संबंधितांची चौकशीदेखील केली जात आहे. मात्र यावेळी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईच्या नावाखाली पैसे वसूल केले जात असल्याने ग्रामस्थांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.









