वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे बंदोबस्तासाठी आलेल्यांना मार्गदर्शन
प्रतिनिधी / बेळगाव
शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी पथसंचलन केले. शहरातील प्रमुख मार्गांवर हे पथसंचलन करण्यात आले. मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस दलाने सर्व तयारी केली आहे. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त शेखर एच. टी., गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या उपस्थितीत झालेल्या पथसंचलनात बंदोबस्तासाठी बेळगावात दाखल झालेले बहुतेक अधिकारी सहभागी झाले होते. राणी कित्तूर चन्नम्मा चौकपासून काकतीवेस रोड, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, यंदे खूट परिसरातून पथसंचलन धर्मवीर संभाजी चौक येथे पोहोचले. त्या ठिकाणी सांगता करण्यात आली. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी बंदोबस्तासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.









