लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
बेळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शहरातील प्रमुख मार्गांवरून पोलीस दलाच्यावतीने पथसंचलन करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पथसंचलनात सीआयएसएफचे जवानही सहभागी झाले होते. गुरुवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास कित्तूर चन्नम्मा चौकापासून पथसंचलनाला सुरुवात करण्यात आली. काकतीवेस रोड, खडक गल्ली, कचेरी रोड, शनिवार खूट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली मार्गे खडेबाजार पोलीस स्थानकात येऊन पथसंचलनाची सांगता झाली. कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने निवडणूक बंदोबस्ताची तयारी पूर्ण केली असून सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी पोलिसांनी हे शक्तीप्रदर्शन केले आहे. बेळगावप्रमाणेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पोलिसांनी शक्तीप्रदर्शन सुरू केले आहे.









