आंदोलन करताच पोलिसांना आली जाग : रात्रीच्या वेळी फिरणाऱ्यांची चौकशी
बेळगाव : सावगाव ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढल्यानंतर झोपेचे सोंग घेतलेल्या बेळगाव ग्रामीण पोलिसांना जाग आली आहे. सोमवारी रात्री धरण परिसरात पोलिसांनी गस्त घालून रात्रीच्यावेळी विनाकारण फिरणाऱ्यांची चौकशी केली. मात्र या कारवाईत सातत्य राहणार का? हे मात्र पहावे लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून नानावाडी रोडवरील सावगाव गावच्या शेतवडीत नशेबाज तरुणांचा वावर वाढला आहे. तसेच प्रेमी युगुलदेखील मोठ्या प्रमाणात ये-जा करत आहेत. हा परिसर निसर्गरम्य असून एकांतात वेळ घालविण्यासाठी प्रेमीयुगुलाकडून या परिसराला पसंती देण्यात येत आहे. मात्र तरुण-तरुणींकडून निर्जनस्थळी अश्लील चाळे केले जात आहेत. दिवसा तसेच रात्रीच्यावेळीदेखील या ठिकाणी प्रेमीयुगुलांचा वावर असतो. एखाद्या ठिकाणी गाडी पार्क करून दूरवरच्या शेतावर जाऊन नको ते कृत्य केले जात आहे. तसेच चारचाकी वाहन रस्त्याकडेला उभी करून वाहनातच प्रेमचाळे केले जात आहेत.
दररोजच्या या प्रकाराला ग्रामस्थ वैतागले आहेत. प्रेमीयुगुलाला हटकल्यामुळे गावातील दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. या विरोधात ग्रामस्थांनी मोर्चा काढून बाहेरून येणाऱ्या तरुण तरुणींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. तसेच गावापासून काही अंतरावर असलेल्या धरण परिसरातील तरुण-तरुणी आणि नशेबाज तरुणांचा धिंगाणा सुरू आहे. विशेष करून रविवारच्या दिवशी या ठिकाणी ओल्या पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. नशेत आरडाओरड करण्यासह दारूच्या बाटल्या फोडल्या जात आहेत. या प्रकारामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून पोलिसांनी यावर कारवाई करत नियंत्रण आणावे, अशी मागणी करत सोमवारी मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांवर दबाव वाढत चालला आहे. सोमवारी रात्री बेळगाव ग्रामीण पोलिसांचे होयसाळ वाहन धरण परिसरात गस्त घालत होते. त्याठिकाणी वाहनात बसून प्रेम चाळे करणाऱ्या युगुलांची चौकशी करत त्यांना हटकण्यात आले. केवळ दिखावा करण्यापुरती कारवाई न करता यामध्ये सातत्य रहावे, अशी मागणी केली जात आहे.









