गणपत गल्लीत कारवाई करत रस्ता केला मोकळा 26
प्रतिनिधी/ बेळगाव
कारवाई व सूचना करूनदेखील गणपत गल्लीत पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण करत व्यवसाय थाटण्यात आल्याने सोमवारी पोलीस आणि महापालिकेच्यावतीने संयुक्त अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यापुढेदेखील शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सातत्याने राबविण्यात येईल, असे वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त जोतिबा निकम यांनी सांगितले.
शहरातील बाजारपेठेला व रस्त्यांना शिस्त लागावी यासाठी पोलिसांकडून गेल्या दोन महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. दुकानांबाहेर व्यवसाय थाटणाऱ्यांवर कारवाई करण्यासह त्यांना सूचना देखील केली जात आहे. सुरुवातीलाच गणपत गल्लीत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतर खडेबाजार, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, रामलिंगखिंड गल्ली आदी ठिकाणीही कारवाई करून अतिक्रमण हटविण्यात आले होते.
दुकानांबाहेर व्यवसाय थाटण्यात येऊ नयेत, त्याचबरोबर फेरीवाले आणि बैठ्या विक्रेत्यांनी पांढऱ्या पट्ट्याच्या आत बसून व्यापार करावा, अशी सूचना करण्यात येत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करत पुन्हा अतिक्रमण करून रस्त्यावर व्यवसाय केला जात आहे. त्यामुळे ही बाब लक्षात येताच सोमवारी वाहतूक पोलीस व महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्यावतीने अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्यात आला.









