गुहागर :
गणेशोत्सवासाठी गुहागरमधून हिंगोलीला आपल्या गावी निघालेले जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, त्यांची पत्नी आणि दोन मुलं असं अख्ख कुटुंब बेपत्ता असल्याचा प्रकार बुधवारी समोर आला. त्यानंतर ऐन गणेशोत्सवात कुटुंबिय, शिक्षक मित्रांसह अख्खी पोलीस यंत्रणा शोधकार्यात अडकली. हिंगोलीपासून ते गुहागरपर्यंत सर्वजण आपापल्या पद्धतीने शोध घेत असतानाच गुरुवारी सकाळी त्यांचा शोध लागला. चव्हाण यांनी स्वत:च आपण गोंदवलेकर येथील मठात सुखरुप असल्याचे कळवले आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.
गुहागर तालुक्यातील पोमेंडी-रांगळेवाडी येथील शाळेवरील शिक्षक म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे पत्नी आणि दोन मुलांसह मूळ गावी हिंगोली येथे गणेशोत्सवासाठी मंगळवारी (26 ऑगस्ट) रोजी दुपारी 3 वाजता गुहागरातून निघाले. मात्र बुधवारपर्यंत त्यांचा कोणताही ठावठिकाणा न लागल्याने अथवा ते हिंगोलीलाही न पोहचल्याने मग सर्वत्र शोधाशोध सुरू झाली.
- बेपत्ताच्या पोस्ट व्हायरल
शिक्षक चव्हाण हे आपल्या कुटुंबियांसह हिंगोलीला न गेल्याने त्यांच्या कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. मात्र चव्हाण पती, पत्नीचे मोबाईल लागत नसल्याने अखेर त्यांच्या शोधासाठीच्या पोस्ट बुधवारी सायंकाळी हिंगोली ते गुहागरपर्यंतच्या सर्व मार्गावरील शिक्षकांकडून सर्वत्र व्हायरल केल्या गेल्या. संपूर्ण मार्गावरील शिक्षक मित्र व सहकारी कुटुंबाच्या शोधासाठी बाहेर पडले. घरातील गणेशोत्सव सोडून कुणी पोलीस ठाण्यात जात होते, कुणी कुंभार्ली, ताम्हीनी, वरंध घाट मार्गावर असलेल्या आपल्या मित्रमंडळींशी संपर्क साधून माहिती घेत होते. त्यांच्या नातेवाईकांनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
- चव्हाणांचे शेवटचे लोकेशन सापडले
शोध सुरु असतानाच गुहागरमधून हिंगोलीला जाताना चव्हाण यांचे शेवटचे लोकेशन चिपळूण असल्याचे पुढे आले. त्यामुळे ते नेमके कोणत्या मार्गाने गेले, याची चर्चा सुरू असतानाच सीसीटीव्ही फुटेजनुसार चव्हाण यांची गाडी कुंभार्ली घाट मार्गे सातारा जिल्ह्याच्या हद्दीत गेल्याचे पोलिसांकडून बुधवारी रात्री स्पष्ट करण्यात आले. त्यानतंर चिपळुणात सुरू असलेल्या चर्चेला थोडा पूर्णविराम मिळाला.
- चव्हाण गोंदवलेकर महाराजाच्या मठात
बुधवारी शिक्षक चव्हाण यांचा शोध न लागल्याने अखेर गुरुवारी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन शोधकार्य अधिक गतीमान करण्याच्यादृष्टीने येथील शिक्षक प्रयत्न करीत असतानाच गुरुवारी सकाळी शिक्षक चव्हाण यांचा आपण सुखरुप असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर येऊन धडकला आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. चव्हाण यांनी आपल्या नातेवाईकांना तसेच गुहागर पोलिसांनाही आपण सुखरुप असल्याचे कळवले.
- मोबाईल भिजल्याने ‘स्वीच ऑफ’
गुहागरमधून निघाल्यानंतर कुंभार्ली घाटात पावसात आमचे मोबाईल भिजल्याने ते बंद झाले. दरम्यानच्या काळात काय करायचं म्हणून नेहमीप्रमाणे या रस्त्यावर सोलापूर जिह्यातील गोंदवलेकर महाराज मठ येथे आपण कुटुंबियांसह एक दिवस मुक्कामी थांबलो होतो. आज घरी निघणार होतो. पण त्याचदरम्यान मला कळलं की संपर्क न झाल्यामुळे सर्वांनाच त्रास झाला. त्यामुळे यंत्रणेसह सर्वांचीच क्षमा मागतो, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.
- पोलीस, शिक्षण विभागाला मनस्ताप
गणेशोत्सवाची धामधूम आणि बंदोबस्तात व्यस्त असलेल्या पोलिसांना मात्र, या प्रकाराचा मोठा मनस्ताप झाला. गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा, शिक्षकाचे मित्र, कुटुंबिय बेपत्ता शिक्षकाच्या शोधात कामाला लागली होती. निष्काळजीपणामुळे पोलीस यंत्रणा, कुटुंबिय, मित्रपरिवार यांना नाहक त्रास सहन करावा लागला. शिवाय शिक्षण विभागाचीही डोकेदुखी वाढली होती.








