विधायक उपक्रमांतर्गत खडेबाजार पोलिसांचे पाऊल
बेळगाव : राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बेंगळूर येथे झालेल्या बैठकीनंतर बेळगावसह संपूर्ण राज्यातील पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या व गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर पोलीस दलाच्यावतीने विधायक उपक्रम सुरू झाले आहेत. रविवारी येथील खडेबाजार पोलीस स्थानकात ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधण्यात आला. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांनी आपल्या पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांना पोलीस स्थानकात बोलावून त्यांच्याशी वार्तालाप केला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पोलीस दलाकडून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांसाठी त्यांचा सल्लाही घेण्यात आला.
माजी महापौर मालोजी अष्टेकर, ए. के. धारवाडकर, पिराजी जांगळे, पी. व्ही. श्रीरंग यांच्यासह बाराहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी या बैठकीत भाग घेतला होता. बेंगळूर येथे 6 जुलै रोजी झालेल्या राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी शहरातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना विधायक उपक्रम राबविण्याचे धडे दिले होते. या बैठकीनंतर पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांनी पुढाकार घेऊन ज्येष्ठ नागरिकांची बैठक घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेण्याबरोबरच त्यांचे जीवनानुभवही ऐकून घेतले. विभक्त व अविभक्त कुटुंब पद्धती, मुलांमधील संस्कार, ज्येष्ठ नागरिकांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्या आदींविषयी तब्बल तासभर मुक्तपणे चर्चा झाली. लवकरच पोलीस आयुक्त कार्यालयातही हा उपक्रम होणार आहे.









